अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत काही अंशी शिथिलता आणली असून, सकाळी ९ ते ४ दरम्यान दुकाने, संकुले, प्रतिष्ठाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नव्या आदेशात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंदच राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांची चिंता सतावू लागली आहे. विशेषत: पालकांना मुलांच्या करिअरबाबत प्रश्नचिन्ह होत आहे.
कोरोनाग्रस्त आणि रुग्णांची मृत्युसंख्या वेगाने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून १ मार्च रोजी ६ पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा आठवडाभर संचारबंदी घाेषित केली होती. मात्र, नागरिक, व्यापारी, दुकानदार, उद्योजकांनी संचारबंदीला विरोध दर्शविला. काही लोकप्रतिनिधींनीसुद्धा एकतर्फी संचारबंदीचा आदेश असल्याचे मत व्यक्त केले होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संचारबंदी शिथिलता आणली आणि ६ मार्चपासून सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित केले. मात्र, या नव्या आदेशात शाळा, महाविद्यालये बंदच राहतील, हे नमूद आहे. परिणामी मार्च २०२० पासून शाळा, महाविद्यालयांना असलेले कुलूप केव्हा उघडणार, असा सवाल आहे. येत्या २३ एप्रिलपासून बारावी, तर २९ एप्रिलपासून दहावीची लेखी परीक्षा होऊ घातली आहे. कोरोना संसर्गातही दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर ऑफलाईन होणार असल्याने पालकांसह विद्यार्थी चिंतातुर झाले आहेत. हल्ली खासगी शिकवणी बंद असून, ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रम अपूर्णच आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांच्या सामोरे कसे जावे, हा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमाेर उपस्थित झाला आहे.
-------------
मार्चअखेपर्यंत शाळा, महाविद्यालये सुरू होणार नाहीत. कोरोना संसर्गाची स्थिती बघून एप्रिलमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू करण्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. तूर्त शाळा, महाविद्यालये बंद राहतील आणि विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अध्ययन करता येणार नाही. ऑनलाईन अध्ययनाची परवानगी आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.
------------------
दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना नियमांचे पालन करूनच
शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जारी केला. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यामुळे कोरोना नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शारीरिक अंतर, आरोग्याची सुरक्षितता, मास्कचा वापर, परीक्षा केंद्रांची सॅनिटाईझ फवारणी, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी व्यवस्था, थर्मल गनद्वारे तापमान तपासणी आदी बाबींना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
-------------------
परीक्षा केंद्रांची लवकरच निश्चिती
दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून होत आहेत. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांसाठी केंद्रे निश्चित करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत परीक्षा केंद्रांची जिल्हा, तालुकानिहाय संख्या, विद्यार्थी आदींची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर परीक्षार्थींना हॉल तिकीट उपलब्ध होईल, अशी माहिती विभागीय बोर्डाच्या सहसचिव जयश्री राऊत यांनी सांगितले.
-----------------