अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील २४८ कोटी ८ लाखांचा अर्थसंकल्प शुक्रवारी अधिसभेत सादर करण्यात आला. ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असे या अर्थसंकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे. १६१ कोटी ९९ लाख एवढी अंदाजित प्राप्ती असून, ८६ कोटी ९ लाखांची तूट अपेक्षित आहे. हा अर्थसंकल्प विकासात्मक दृष्टिकोनातून असल्याने तुटीचा सादर करण्यात आला.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रफुल्ल गवई यांनी अर्थसंकल्प सादर केला. परिरक्षण, विकास, स्वतंत्र प्रकल्प, योजना किंवा सहयोग कार्यक्रम अनुदाने या बाबींवर तो तयार करण्यात आला आहे. भाग- १ या परिरक्षणात विद्यापीठाच्या दैनंदिन आवर्ती स्वरुपाच्या प्राप्ती व शोधनाचा समावेश आहे. भाग-२ मध्ये विकासात विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन व केंद्र शासनाकडून प्राप्त विकासात्मक अनुदान आणि त्यामधून होणाऱ्या शोधनाचा तसेच विद्यापीठ साधारण निधीमधून होणाऱ्या भांडवली शोधनाचा समावेश करण्यात आला आहे. भाग-३ मध्ये स्वतंत्र प्रकल्प, योजना किंवा सहयोगी कार्यक्रम यासाठीच्या प्राप्त अनुदानांमधून करण्यात येणाऱ्या खर्चाचे शोधनसंबंधी तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात विकासकामांवर ५७ कोटी ७५ लाख ९ हजार ९५६ रुपयांची तरतूद करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने इमारत बांधकामे, प्रशासकीय विभागासाठी उपस्कर, उपकरणे, संगणक व तत्सम साहित्य व सॉफ्टवेअर, शैक्षणिक विभागासाठी साहित्य निधी खर्च करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, प्रदीप खेडकर आदींनी सहभाग घेतला. अर्थसंकल्प प्रफुल्ल गवई यांनी सादर केला, तर प्रशासनाला कार्यवृत्तांच्या मुद्द्यावरून मनीष गवई यांनी कोंडीत पडकले. त्यामुळे बजेटची अधिसभा दोनच गवईंनी गाजविल्याची चर्चा होती.
----------
बॉक्स
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
* प्रशिक्षण व कौशल्य विकास - ५ लाख
* गाडगेबाबा पेयजल, एसटी बस, विमा सुरक्षा - ३५ लाख
* बुलडाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालय - २३ लाख
* अविष्कार योजना - ३० लाख
* ग्रंथालयीन सुविधा - ३ कोटी ५३ लाख ९७ हजार
* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गृहबांधणी - ५ कोटी
* दुचाकी वाहन खरेदी - १ कोटी
* प्रशासकीय इमारती - १५ कोटी
* बृहत आराखडा - ६१ लाख ३७ हजार
* स्थायी दीक्षांत मंडप उभारणी - १ कोटी
* संत गाडगेबाबा सायकल योजना - ५ लाख
* योग केंद्र निर्मिती - १ कोटी
------------
विद्यापीठाचा नवीन पुढाकार
आपत्ती व्यवस्थापनातून कोविड लढ्यासाठी - २२ लाख ६० हजार
अद्ययावत सुसज्ज रुग्णवाहिका - १७ लाख ५० हजार
विद्यापीठ प्रयोगशाळेत कोरोना चाचणी - १ लाखांपेक्षा जास्त
कोविड काळात विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी एक कोटी
विद्यापीठात पाच तळ्यांचे खोलीकरण - ७० लाख
-----------------
नुटाचे अधिसभा सदस्य गैरहजर
शुक्रवारी अर्थसंकल्पाचा अधिसभा सभेत नुटा संघटनेशी संबंधित बहुतांश अधिसभा सदस्य गैरहजर होते. यात नुटाचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी, भीमराव वाघमारे, विवेक देशमुख, भैयासाहेब मेटकर, अर्चना बाेबडे, संतोष ठाकरे, गजानन कडू यांनी गैरहजर राहण्याबाबत कुलसचिवांना पत्राद्वारे कळविले. तसा संदर्भ कुलसचिव तुषार देशमुख यांनी अधिसभेत दिला.