ना. नितीन गडकरी, अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभात शंकरबाबांना डी.लिट प्रदान
अमरावती : नव्या पिढीला चांगली दिशा आणि प्रगतीच्या वाटा दाखवायच्या असेल तर, प्रत्येक विद्यापीठाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनाची ब्ल्यू प्रिंट तयारी करावी. या माध्यमातून गरीब, शोषित, दीनदलितांचे प्रश्न, समस्या सोडवून देशाच्या विकासात सहकार्य करावे, आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३७ व्या आभासी दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून दीक्षांत भाषण ना. गडकरी यांनी केले. समाजात परिवर्तनासाठी अजूनही बरेच काही करावे लागणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे, तर अंधश्रद्धेतून ज्ञानाकडे वाट शोधावी लागणार आहे. ही जबाबदारी शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, शिक्षक, प्राध्यापकांना पार पाडावी लागेल, असे गडकरी म्हणाले. आता शेती, आरोग्य, रोजगारासाठी नवे तंत्रज्ञान अवगत केल्याशिवाय गत्यंतर नाही. विशेषत: अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. आता कापसापासून सूत तर, सुतापासून कापड हा मंत्र स्वीकारून विकासाची वाट शोधावी लागणार आहे. अमरावती एमआयडीसीत लेनिन कापड तयार होत असून, लेनिन झाडाची साल जर्मन येथून आणली जाते. त्यामुळे लेनीन झाडाची लागवड विदर्भात करता येईल का? याबाबत विद्यापीठाने संशोधन करावे. जेणेकरून भविष्यात विदर्भातील शेतकरी सुजलाम्, सुफलाम् कसा होईल, याचा मार्ग संशोधकांनी शोधावा, असा सल्ला ना. गडकरी यांनी दिला. अमरावती जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील डाळ खरेदी करण्याचा निर्णय टाटा कंपनीने घेतला आहे. त्यामुळे खारपाण पट्ट्यातील शेती उत्पादन क्षमता वाढीसाठी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असे ना. गडकरी यांनी सांगितले.
दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, डी.लिट. पदवीप्राप्त शंकरबाबा पापळकर, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ,सी. रघुवंशी, अविनाश माेहरील, वैशाली गुडधे, व्ही. डब्ल्यू. निचित, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य मीनल ठाकरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले.
---------------
अनाथांचा नाथ शंकरबाबांना डी.लिट.प्रदान
अनाथ, अपंगांसाठी आयुष्य वेचणारे शंकरबाबा पापळकर यांना अमरावती विद्यापीठाने मानव विज्ञान पंडित (डी.लिट.) प्रदान केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी शंकरबाबांना सन्मानपत्र, रोख रक्कम, मानपत्र देऊन गौरविले. यावेळी संत गाडगेबाबा यांच्यानंतर समर्पित जीवन, सेवाभाव, स्वच्छता आणि सामाजिक कार्यात झोकून देणारे शंकरबाबांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे भावोद्गार ना. गडकरी यांनी यावेळी काढले. शंकरबाबांचा हा सन्मान माझ्या आयुष्यातील अवस्मरणीय क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
----------------
विद्यार्थ्यांना देणार स्मार्ट कार्ड : ना. सामंत
अमरावती विद्यापीठाने कोरोना काळात अतिशय चांगली कामगिरी बजावली, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, यापुढे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्मार्ड कार्ड देण्याचे नियोजन असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. या स्मार्ट कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक पूर्ततेची कागदपत्रे असतील. प्रवेशपत्र, ओळखपत्र, विमा कवच यासह विद्यार्थ्यांची हिस्ट्री या स्मार्ट कार्डमध्ये असेल, असे ना. सामंत म्हणाले. विद्यापीठाने शंकरबाबांना डी.लिट.प्रदान केल्याचा हा समारंभ माझ्या राजकीय दृष्टीने स्वप्नवत आहे. ही बाब विद्यापीठासाठी गौरवशाली आहे. शंकरबाबा म्हणजे अनाथांचा नाथ नव्हे तर बाप आहे, असे ना. सामंत म्हणाले.