उत्साह द्विगुणित : रंगोली परिवार, नेताजी मंडळाचा सहभाग, सुरेल गीतांनी बहरले वातावरण, लक्षणीय उपस्थिती अमरावती : लोकमत सखीमंच नेहमीच सण, व्रत, उत्सवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. यंदाच्या दीपावली पर्वावरसुद्धा लोकमत सखीमंचद्वारे अमरावतीकरांना स्वरचैतन्याने भारलेल्या दीपावली पहाटची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित अंबानगरी वासीयांचा उत्साह द्विगुणित झाला. लोकमत संखीमंच, रंगोली परिवार व नेताजी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक नेताजी मंडळाच्या मैदानावर आयोजत या कार्यक्रमात आर.टी.म्युझिकल ग्रुपने एकापेक्षा एक सरस गाणी सादर केलीत. रवी खंडारे यांचे सुरेल बासरीवादन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. त्यांनी बासरीवर पहाडी राग, हिरोची धुन, शिवरंजनी यांसारख्या एकापेक्षा एक सरस रागांवर आधारित धून सादर केली. कार्यक्रमात आ. सुनील देशमुख, नगरसेवक नितीन देशमुख, 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, मानसोपचारतज्ज्ञ श्रीकांत देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात ‘आली माझ्या घरी ही दिवाळी, सूर निरागस हो, तू बुद्धी दे, मोह मोह के धागे’ आदी गीते सादर केली. रसिक प्रेक्षकांनी या गीतांना भरभरून दाद दिली. गायक कलाकारांमध्ये नयना दापुरकर, राहुल तायडे, शीतल भट, दीक्षा तंतरपाळे, प्रशांत खडसे यांचा समावेश होता. वादकांमध्ये सौरभ डोनाल्ड यांनी गिटार, वीरेंद्र गावंडे आॅक्टोपॅड, प्रवीण जोंधळे, विशाल पांडे, मनीष आत्राम यांनी ढोेलकीवर साथ दिली. कार्यक्रमाचे संचालन नितीन भट यांनी केले. या कार्यक्रमात रंगोली परिवाराने व सखींनी दिव्यांची अनोखी आरास केली होती. तर मेघा खरड यांच्या संस्कार भारती रांगोळीने कार्यक्रमात वेगळेच चैतन्य निर्माण केले होते.या कार्यक्रमात नेताजी मंडळाचे सभासद व अमरावतीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
अमरावतीकरांना ‘दिवाळी पहाट’ची अनोखी भेट
By admin | Updated: November 3, 2016 00:21 IST