रामनगरातील प्रकार : महापालिकेच्या कारवाईकडे लक्षअमरावती : शहरातील एका लब्धप्रतिष्ठिताने धनशक्तीच्या जोरावर चक्क सर्व्हिस लाईन बंद करून त्यावर बांधकाम केल्याचा प्रकार रामनगर-एलआयसी कॉलनी भागात उघड झाला आहे. राजरोसपणे हा प्रकार होत असताना महापालिका यंत्रणा या अनधिकृततेवर कारवाई करेल का, असा सवाल परिसरातील संत्रस्त् नागरिकांनी उपस्थित केला आहे. रामनगरातून पुढे कृषक कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून विनोद राठी यांच्या मालकीच्या दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या निर्माणाधीन इमारतीच्या मागे मोठी सर्व्हिस लाईन असून त्यापुढे राठी यांचेच मालकीची इमारत आहे. या दोन्ही इमारती जोडण्यासाठी राठी यांनी दोन प्लॉटच्या मधोमध असलेली सुमारे १०० ते १२५ फूट लांबीची आणि १५ ते २० फूट रुंदीची सर्व्हिस लाईन दडपली आहे. डॉ. साळुंखे, गवळी आणि दळवी यांच्या घराच्या मागून असलेली ही सर्व्हिस लाईन राठी यांनी त्यांच्या प्लॉटपुरती बुजवून टाकली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांच्या प्लॉटचे बांधकाम जेथे संपते, तेथे कोपऱ्यावर या सर्व्हिस लाईनवर त्यांनी आडव्या भिंतीचे बांधकामही केले आहे. याखेरिज सर्व्हिस लाईनच्या मोठ्या परिसरात त्यांनी बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी मोठे बांधकाम तसेच खोलीची उभारणी केली आहे. मूलभूत सुविधांमध्ये गणली जाणारी सर्व्हिस लाईन बंद करण्याचा प्रताप या इमारत धारकाने चालविला आहे. या अवैध बांधकामासह सर्व्हिस लाईन दडपविल्याची तक्रार महापालिका यंत्रणेकडे केल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’ ला दिली. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामाने सर्व्हिस लाईन गिळंकृत!
By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST