नांदगाव पेठ : रहाटगाव येथील पूनम टाईल्सजवळ निर्दयी मातेने एक दिवसाच्या नकोशिला रस्त्यावर फेकल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. सकाळी ७ वाजतादरम्यान आॅटोचालक त्या मार्गावरून आॅटो घेऊन जात असताना हा प्रकार लक्षात येताच त्याने पोलिसांना कळविले. नांदगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्या जिवंत अर्भकाला ताबडतोब जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी सकाळी ७ वाजता हा प्रकार उघडकीस आला.प्राप्त माहितीनुसार, नांदगाव येथून अजय कांबळे नामक आॅटोचालक सकाळी प्रवासी घेऊन अमरावतीकडे जाताना रहाटगाव येथील पूनम टाईल्सजवळ रस्त्याच्या कडेला एक स्त्री जातीचे जिवंत बाळ बेवारस अवस्थेत आढळून आले. कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना घटनेची माहिती दिली व त्या बाळाला घेऊन ताबडतोब जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले.अंधाराचा फायदा घेत निर्दयी मातेने नकोशीला जन्म दिला असावा व रात्रीच फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई मधुकर धनोकर तपास करीत आहे. सायंकाळ पर्यंत कुठलेच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. ती नकोशी सध्या वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत असून प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते बाळ कुणाचे असावे, याबाबतची चौकशी नांदगाव पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
निर्दयी मातेने 'नकोशी'ला फेकले रस्त्यावर
By admin | Updated: October 28, 2016 00:18 IST