धरपकड सुरूच : गावकरी दहशतीच्या छायेत अमरावती : माहुली (जहांगिर) येथील उद्रेकाला १४ दिवस लोटल्यानंतर पोलिसांनी दोषी गावकऱ्यांविरूध्द अटकसत्र सुरु केले. ७ व ८ सप्टेंबर या दोन दिवसांत माहुली पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. त्यानंतर शुक्रवार व शनिवारी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. २५ आॅगस्ट रोजी माहुलीत साहिल डायरे या चिमुकल्याचा एसटीखाली आल्याने मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांमध्ये असंतोष उफाळला. जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गावकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करुन चौकशी सुरु केली. तब्बल चौदा दिवसांनंतर पोलिसांनी धरपकड मोहीम सुरु केली. यामध्ये जाळपोळ व लुटमारीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी रवी पेठेकर, योगेश यावस्कर, मार्कंड सुरडकर, छत्रपती गणपत सपकाळ यांना अटक केली तर माहुली पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्याप्रकरणी पोलिसांनी उपसरपंच अब्दुल अन्सार अब्दुल जब्बार व शिरीष टवलारे यांना अटक केली. तसेच गजानन भोनेला ८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटकेची मोहीमेमुळे अर्धेअधिक माहुलीवासी गाव सोडून पसार झाले. दरोडा व जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी होमगार्ड किशोर लंगडेला अटक केली असून शनिवारी प्रदीप श्रीराम भोनेला अटक केली आहे. प्रदीपने अग्निशमन दलाच्या वाहनावर चढून उड्या मारल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. लंगडे याला न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकपूर्व जामीन रद्द करण्याचे प्रयत्नमाहुली येथील प्रकरणात काही जणांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, जामिन रद्द करण्यासाठी माहुली पोलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेणार आहेत. सोमवारी पोलीस नागपूर खंडपीठात जातील. अटकपूर्व जामिन अर्जावर १४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. आतापर्यंत सात माहुलीवासियांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार, शनिवारी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरु आहे. ज्या गावकऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले , त्यांची जमानत रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येईल. - प्रकाश हिंगमिरे, प्रभारी पोलीस निरीक्षक,
माहुली प्रकरणात आणखी दोन अटकेत
By admin | Updated: September 13, 2015 00:13 IST