लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने बुधवारी धारणी तालुक्यातील २५ गावांच्या समस्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी धडक दिली. महावितरणने लेखी आश्वासन दिल्याने तणाव निवळला.
धारणी तालुक्यातील ढाकणा फिडरमधील जवळपास २५ गावांमध्ये कैक दिवसांपासून कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी शेतीच्या नुकसानीसह पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्याने नदी-नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. सबब, बुधवारी दुपारी शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी राणामालूरच्या सरपंच गंगा जावरकर, जनक्रांती सेनेचे मन्ना दारसिंबे यांच्यासह बिजुधावडी, तातरा, गडगा भांडुम, झापल, ढाकणा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
लो व्होल्टेजची समस्या
- ढाकणा फीडर अंतर्गत शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ लो व्होल्टेजच्या समस्येने ग्रस्त आहेत.
- शेतकऱ्यांचे सिंचन, गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. नागरिकांना नदी-नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
- ढाकणा फीडरवरील समस्यांचे तत्काळ निराकरण केले जाईल.
- ठिकठिकाणी कॅपॅसीटर बॉक्स बसवू. व्होल्टेज मध्ये सुधारणा करू, असे लेखी आश्वासन महावितरणने दिले आहे.