धामणगाव रेल्वे : तालुक्यातील अडीच हजार घरकुलाचा पहिला हप्ता मार्च महिना संपण्यापूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा व्हावा. त्यांना जागा उपलब्ध व्हावी, यासाठी पंचायत समितीतील आठ सर्कलमध्ये नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, घरकुलाचे उद्दिष्ट युद्धस्तरावर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
धामणगाव तालुक्यात ४ हजार १०७ घरकुलांना मंजूरी मिळाली होती. यातील काही घरकुलांना कामे पूर्ण झाली. मात्र, अंजनसिंगी, जुना धामणगाव, वरूड बगाजी, मंगरूळ दस्तगीर, देवगाव, निंबोली, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द या पंचायत समिती सर्कलमधील घरकुल जागेअभावी रखडले होते. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी तातडीने बैठक घेऊन आठही सर्कलमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. ज्या लाभार्थींना जागा नसेल, त्यांना जागा उपलब्ध करून देणे, बक्षीसपत्र किंवा शासनाच्या नव्या नियमाप्रमाणे घरकुल जागा देण्यात यावी. त्यासाठी कामाला गती दिली आहे. ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थींच्या फायली तयार करायला सुरुवात केली आहे. मार्च महिना संपण्यापूर्वी घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात यावा, असे निर्देश पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी दिले आहेत.