फोटो १३एएमपीएच१५ साहित्य संमेलन
‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी श्रृंखलेतून मुक्त करून उद्घाटन
अमरावती : वऱ्हाड विकास व उपेक्षित समाज महासंघातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिपर्वाचे औचित्य साधून १० व ११ मार्च रोजी ऑनलाईन बारावे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन पार पडले.
महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ ग्रंथाला लोखंडी श्रुंखलातून मुक्त करून वासुदेव चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सत्यशोधक व विचारवंत सतीश जामोदकर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन हे धर्मनिरीपेक्ष -प्रजासत्ताक लोकशाहीचा एल्गार बनले आहे. शोषणमुक्त, विषमतामुक्त समाजनिर्मितीचे महात्मा फुले यांचे स्वप्न होते, असे वासुदेव चौधरी म्हणाले. मनुवादी, विषमताधिष्ठित व्यवस्था परिवर्तनासाठी आणि शोषणमुक्त, भयमुक्त व समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी तसेच जाती व धर्मांधतेच्या विषारी चक्रव्यूहांतून बाहेर पडण्यासाठी भारतीयांना फुले-शाहू-आंबेडकरांचे सत्यशोधकी विचारांचीच कास धरावी लागेल, असे परखड मत आयोजक तथा महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बनसोड यांनी मांडले. संचालन प्रभाकर वानखडे यांनी केले. अरुण बुंदेले यांनी स्वागतगीत गायिले. प्रवीण खांडवे यांनी आभार प्रदर्शन केले.
बॉक्स
शेतकऱ्यांचा आसूड व केंद्र सरकारचे कृषी धोरणावर मतांतरे
‘महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड आणि केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण’ या विषयावरील परिसंवादातून ख्यातनाम विचारवंत सुुकुमार पेटकुल, (आदिलाबाद) तसेच प्रदीप शेवतकर यांनी महात्मा फुलेंचे शेती व शेतकरी संदर्भातील विचार आणि केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तसेच शंभर दिवसांपासून न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा परामर्श घेतला. प्रभाकर वानखडे यांनी महात्मा फुलेंचे तत्त्वज्ञान हे समतेची व मानवतेची शिकवण देणारे असल्यामुळे ते प्रत्येकाने आचरण्यात आणण्याची गरज असल्याचे मत मांडले.