पळालेला ट्रक पकडला : अमरावती-परतवाडा महामार्गावर भूगावनजीकची घटना परतवाडा : चंद्रपूरवरुन परतवाडाकडे येणाऱ्या एसटी बसला विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या केळी भरलेल्या ट्रकने अक्षरश: चिरडत नेले. मंगळवारी रात्री १० वाजता भूगावनजीक हा भीषण अपघात झाला. यात एक जण ठार, १६ जखमी व सहा प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमींवर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयासह खासाी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघात केल्यावर पळालेला ट्रक पोलिसांनी वलगाव नजिक पकडला. प्रवीण किसनराव चिमोटे (३२) रा. कविठा असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून तो अमरावती येथे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाच्या बैठकीसाठी गेला होता. तर प्रीती बहाडे, यशवंत बहाडे, सिद्धेश बहाडे रा. परतवाडा, नीलेश तायडे रा. अंजनगाव, एस.टी. बस चालक प्रमोद चांदुरकर, वाहक केशव लांडगे रा. चंद्रपूर अशी गंभीर जखमींची नावे असून इतर किरकोळ जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन सुटी देण्यात आली. अपघात करुन ट्रक पळाला अंजनगाव येथून केळी भरुन नागपूरकडे निघालेला ट्रक एमएच-४०-ए के ११४० चा चालक सुजीत झियालाल पोडे (२९) रा. उमरी रोड नागपूर याने भरधाव वेगाने चंद्रपूरवरुन परतवाड्याकडे येणाऱ्या एसटी बस एमएच ४० वाय ५५२९ ला भूगावनजीकच्या रणबाबा वळणावर जोरदार धडक दिली. बस चालकाने वाचविण्याचा आटोकात प्रयत्न केला. मात्र ट्रक बसला उजव्या बाजूने चिरडत गेला. अपघात घडताच ट्रकने पलायन केले. अचलपूरचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून तत्काळ जखमींना रुग्णालयात पाठविण्यासोबत नाकाबंदी केली. त्यामध्ये वलगावनजीक ट्रक पकडण्यात पोलिसांना यश आले. चालकाच्या फिर्यादीवरुन अचलपूर पोलिसांनी आरोपी ट्रक चालक सुजीत पांडे विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
ट्रकची एसटी बसला धडक, एक ठार
By admin | Updated: June 23, 2016 00:03 IST