अमरावती : जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व आदिवासी शेतकऱ्यांकरिता ही योजना असून त्यांना या योजनेअंतर्गत शेतात सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
योजनेसाठी समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सन २०२१-२२ या वर्षात मंजूर निधीच्या ६० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेत नवीन विहिरीकरिता २ लाख २५ हजार, जुनी विहीर दुरुस्तीकरिता ५० हजार, विद्युत जोडणीसाठी १० हजार, विद्युत पंप संचाकरिता २० हजार, सौर कृषी पंपाकरिता ३० हजार व सूक्ष्म सिंचनाकरिता ९० टक्के मर्यादित पूरक अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध व आदिवासी शेतकरी असावा, त्यांच्या नावे जमीन धारणेचा सातबारा व आठ अ असणे आवश्यक आहे. तो नगरपालिका, नगरपंचायती व मनपा क्षेत्रातील असू नये, त्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये अधिक नसावे. जातीचे प्रमाणपत्र, ग्रामसभेने शिफारस केलेला ठराव असावा, आधार कार्ड व बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकणार आहे. लॉटरीव्दारे निवड करता येणार असून, अनुदान अदा करणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. योजनेच्या सविस्तर माहितीकरिता पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सभापती विठ्ठल चव्हाण व कृषी विकास अधिकारी उज्ज्वल आगरकर यांनी केले आहे.