अमरावती : दऱ्याखोऱ्यात, वस्ती, वाड्यावर वास्तव्यास असलेल्या गरीब आदिवासी कुटुंबातील मुलांना डॉक्टर्स, अभियंते होता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ‘नीट’, ‘जेईई’ प्रवेशपूर्व परीक्षेकरिता प्रशिक्षण सुरू केले. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली. यंदा २८ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) तर सहा विद्यार्थी जेईई उत्तीर्ण झाले. ज्या घरात शिक्षणाचा गंध नव्हता, अशा घरांची आदिवासी मुले येत्या काळात डॉक्टर, अभियंते होणार आहेत.
अमरावती एटीसी अधिनस्थ धारणी, अकोला, किनवट, छत्रपती संभाजीनगर, पुसद, कळमनुरी, पांढरकवडा या सातही एकात्मिक प्रकल्प कार्यालय अंतर्गत ८२ शासकीय आश्रमशाळांमधून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अनुक्रमे ‘नीट’ व ‘जेईई’चे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये यंदा ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते आता भविष्यात मेडिकल, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन करिअर करतील. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार धारणी एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्थ आश्रमशाळांतून १०, किनवट १३ तर पांढरकवडा ११ विद्यार्थी नीट, जेईईची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनात धारणी प्रकल्प अधिकारी प्रियवंदा म्हादळकर, किनवट प्रकल्पाच्या तत्कालीन प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, किनवटचे प्रकल्प अधिकारी डॉ. जेनीत दोनथुला यांनी नीट, जेईई प्रशिक्षण संदर्भात संदर्भात मोलाची कामगिरी बजावली.
नांदेड येथे मोफत कोचिंग क्लासेसअकरावीत प्रवेशित आदिवासी विद्यार्थ्यांना नांदेड येथे नामांकित संस्थेत नीट, जेईई या परीक्षांच्या तयारीसाठी शिकवणी वर्ग लावण्यात आले. आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी गरीब व होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य व कीट दिली. नीट प्रवेशपूर्व परीक्षेकरिता २२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १५ विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू झाला.
"आदिवासी विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, यासाठी विविध उपक्रम, योजनांची मुहूर्तमेढ रोवली आहे. अमरावती एटीसी अंतर्गत राबविलेला नावीन्यपूर्ण उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे यंदा ३४ आदिवासी विद्यार्थी नीट, जेईई उत्तीर्ण होऊन येत्या काळात डॉक्टर्स, अभियंते होतील. हा उपक्रम राज्यभर राबवू."- प्रा. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री