अधिसूचनेला खो : हप्तेखोरीसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ संदीप मानकर अमरावतीशहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि वाढत्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी खासगी बसेसला शहरात प्रवेशबंदी केली. राज्य महामार्गावरील ‘वेलकम पॉइंट’नजीक ट्रॅव्हल्सला थांबा देण्यात आला. मात्र, या खासगी ट्रॅव्हल्सनी आता पुन्हा पंचवटी चौकात बस्तान मांडले आहे. या बसेस पंचवटी चौकात उभ्या राहत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. पंचवटी चौकात अनेक शाळा, महाविद्यालये असल्याने येथे मोठी रहदारी असते. तथापि मागील काही दिवसांपासून ट्रॅव्हल्सने पुन्हा शहरात शिरकाव केला असून पंचवटी चौकातील मेडिकल कॉलेजनजीक या बसेसचे नियमबाह्य पार्किंग केले जात आहे. याला अभय कुणाचे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन वर्षांपूर्वी 'लोकमत'ने खासगी ट्रॅव्हल्सच्या शहरातील मुक्त संचाराचा विषय लावून धरला होता. त्यामुळे या खासगी ट्रॅव्हल्ससाठी वेलकम पॉइंटनजीक अधिकृत पार्किंग व्यवस्था वाहतूक पोलिसांनी करून दिली होती. परंतु मागील काही दिवसांपासून विविध कंपनींच्या खासगी बसेस येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयासमोर व पंचवटी चौकातील पेट्रोलपंपाजवळ या खाजगी वाहनांची पार्किंग करण्यात येते. येथूनच नागपूर- पुणे, मुंबई, नाशिक भोपाळ व इतर ठिकाणांची प्रवासी खासगी बसेसमध्ये या ठिकांनावरूनच प्रवासी चढण्यात येते. एसटी महामंडळाच्या बसेसचा थांबा असल्यामुळे येथे प्रवाशांंची गर्दीे असते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. येथे नेहमीच अनेक खासगी ट्रॅव्हल्स उभ्या राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. येथून रोज २५ ते ५० लक्झरी ट्रॅव्हल्स पुणे, मुंबई, नागपूर व इतर मेट्रोसिटीकरिता सुटतात. ही जडवाहने शहरात शिरतातच कशी? आणि या वाहनांच्या पार्किंगला वाहतूक पोलीस कशी काय परवानगी देतात,, हा प्रश्न अंबानगरीतील नागरिकांना पडला आहे. पोलीस आयुक्तांनी घ्यावी कठोर भूमिका पंचवटी चौकात अवैधरीत्या पुन्हा खासगी बसेसचा शिरकाव झाला आहे. हे नियमबाह्य असून राजोरोसपणे लक्झरीचे चालक- मालक पंचवटी चौकात पार्किंग करतात. येथूनच बुकिंगही केले जाते. येथूनच प्रवाशांनाही बसमध्ये बसविले जाते. त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, हा मुद्दा जोर धरू लागला आहे. याबसेस शहराबाहेर काढण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी पुढाकार घ्यावा व या बसेसच्या मालकांना अभय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांद्वारे होत आहे. वाहतूक पोलिसांचे अभय शहरातील पंचवटी हा महत्त्वाचा चौक आहे. येथील पीडीएमसी महाविद्यालयात रूग्ण व विद्यार्थ्यांची गर्दी असते. या भागात सतत वर्दळ सुरू असते. येथे रुग्णवाहिका येतात. त्यांच्यासह अन्य वाहनांना या खासगी बसेसमुळे अडथळा निर्माण होतोे. या बसेसच्या पर्किंगकरिता मोर्शी मार्गावर वेलकम पॉइंटनजीक अधिकृत जागा दिली असताना त्यांचा शहरात शिरकाव का, हा प्रश्नच आहे. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच खासगी ट्रॅव्हल्स हळूहळू पुन्हा शहरात प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ट्रॅव्हल्स पुन्हा पंचवटी चौकात !
By admin | Updated: June 24, 2016 00:26 IST