व्यावसायिकांना तंबी : पीयूसी व्हॅनसह हातगाडीही हटविलीअमरावती : इर्विन चौकातील शहर वाहतूक शाखेचा शेजारील परिसर अखेर शनिवारी मोकळा झाला. अतिक्रमणाने घुसमटलेल्या या परिसराने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांच्या नेतृत्वात येथील पानटपरी, पंक्चर व्यावसायिक, पीयूसी व्हॅन आणि चायनीज पदार्थ विकणारी हातगाडीचे अतिक्रमण काढण्यात आले. ‘दिव्याखालीच अंधार, वाहतूक शाखेला अतिक्रमणाची घेराबंदी’ असे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने अवैध पार्किंगचा मुद्दा लोकदरबारात नेला होता. या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी एसीपी बळीराम डाखोरे यांनी शहर वाहतूक शाखेच्या शेजारच्या पदपथावर कब्जा करणाऱ्या व्यावसायिकांना २४ तासांचा ‘अल्टिमेटम’ देऊन अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी डाखोरे यांनी मनपाच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांशी चर्चा करुन व मदत घेऊन पदपथ मोकळा केला. शनिवारी दुपारनंतर या भागातील अवैधरीत्या व्यवसाय करणाऱ्यांना तंबी देऊन त्यांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले. यापुढे कुठल्याही परिस्थितीत कुठलेही अतिक्रमण आणि वाहतुकीस अडथळा येणारी पार्किंग सहन केली जाणार नाही, अशी तंबी देण्यात आली.
वाहतूक शाखेचा ‘शेजार’ मोकळा
By admin | Updated: January 31, 2016 00:11 IST