अमरावती : मोर्शीतील खुल्या कारागृहात आयोजित महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन हे समताधिष्ठित परिवर्तनाला गती देणारे संमेलन ठरेल, असे प्रतिपादन गणेश मुळे यांनी केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाचव्या सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या समारोेपाप्रसंगी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी पालखीत महात्मा फुले यांच्या समग्र साहित्य व भारतीय राज्यघटनेची प्रत ठेऊन त्यांचे पूजन करण्यात आले. परिवर्तनवादी गीत गायनाने आसमंत दणाणून गेला. प्रास्ताविक श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. माणूसपण नाकारणारे साहित्य हद्दपार करण्यासाठी व खुल्या कारागृहातील बंदीजनांमधील सुप्त कलागुणांना विचारपीठ उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी विशद केली. संमेलनात दहा ठरावांचे वाचन करून ते एकमताने पारित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर विचार व्यक्त केले. राष्ट्रीय प्रबोधनकार कमलाकर धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तनवादी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात ज्येष्ठ कवियत्री वंदना हरणे यांनी खुसखुशीत विनोद निर्मितीसह संचालन केले. ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजनही साहित्य संमेलनादरम्यान करण्यात आले होते.
सत्यशोधक साहित्य संमेलनामुळे परिवर्तनाला गती
By admin | Updated: March 12, 2015 00:49 IST