अमरावती : मेळघाट वनक्षेत्रातील नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी वनमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक, आमदार रवी राणा, आमदार केवलराम काळे, यशवंत काळे तसेच शैलेश म्हाला आदी उपस्थित होते. या बैठकीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तत्काळ अनुकंपा तत्त्वावर शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश मंत्री गणेश नाईक यांनी दिले. तसेच, मेळघाट वन विभागाकडून थांबवण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना नव्याने गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नरभक्षक वाघाला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत अप्पर मुख्य वनसचिव मिलिंद म्हैस्कर, प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य (वन्यजीव) नागपूर, वनरक्षक अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, आदर्श रेड्डी क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि अमरावतीचे उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयांमुळे मेळघाटातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात संरक्षण आणि आदिवासी भागाचा विकास या दोन्ही बाबतीत शासनाने ठोस पावले उचलली आहेत. नरभक्षक वाघाने आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतल्याची बाब समोर आली आहे.
या रस्त्याचे नव्याने होणार डांबरीकरण
बारूखेडा ते झरी, चौराकुंड ते फुकमार, खोकमार ते दतरू, राजापूर ते रेटाखेडा, माखला ते जरीदा, रेस्ट हाऊस ते हरिसाल, कोंगळा ते कळमगुना, केशरपूर ते मालूर, फॉरेस्ट ते जाबळी आर रेंज या रस्त्यांवर काम सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मेळघाटात विश्रामगृहे कात टाकणार
बेलकुंड, ढाकणा, हतरू, तारूबांदा, माखला, कोकरू, कोलकास, सेमाडोह, घटांग येथील वन विभागाच्या विश्रामगृहांचे आधुनिकीकरण दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सौंदर्याकरणाचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.तसेच अमरावती तालुक्यातील 3 मंजूर रामवाटिका २५ कोटींच्या निधीतून बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.