नागरिकांना फटका : ‘ई-फेरफार’ची कामे रेंगाळली चांदूरबाजार : शासनाकडून तलाठ्यांकरिता ई-फेरफार प्रणालीसाठी लागणाऱ्या नेट कनेक्टिव्हिटीचा ७५० रुपये मासिक खर्च शासनातर्फे देण्यात आले आहे. त्याप्रमाणे मार्च २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या ११ महिन्यांची रक्कम स्थानिक तहसीलदार यांच्याकडे जमा झाली आहे. मात्र ही रक्कम तलाठ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने एडिट मॉड्युलचे सुरु असलेले काम १ आॅगस्टपासून पूर्णपणे बंद करण्यात आले, तर डीएससी तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्याने सर्वसाधारण नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा अचलपूरच्यावतीने २७-६-१६ रोजी उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्याकडे निवेदन देऊन निरनिराळ्या आठ मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामधून फक्त दोनच मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. अचलपूर उपविभागात ८ फेब्रुवारी २०१५ रोजी ई-फेरफार प्रणालीला सुरुवात झाली. यातील सर्व बाबी ओडीयू, ओडीसी, ई-फेरफार व नवीन एडीट मॉड्युल बाबीमध्ये सर्व तलाठी इमानेइतबारे काम करीत असल्याने तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. या प्रणालीकरिता शासनाकडून ७५० रुपये प्रतिमाह रक्कम देण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी २०१६ पर्यंतच्या ११ महिन्यांची रक्कम तहसील कार्यालयात जमा झाली आहे. मात्र ही रक्कम जमा झाल्यानंतरही तलाठीच्या खात्यावर वळती करण्यात आली नसल्याने विदर्भ पटवारी संघाने १ आॅगस्ट २०१६ पासून काम बंदचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व तलाठींनी आपल्याकडील डीएससी तहसील कार्यालयात जमा केले. त्यामुळे आता आॅनलाईन ७/१२, आठ अ, ई-फेरफारचे काम बंद, एडिट मॉड्युलचे काम युद्धस्तरावर सुरू असलेले बंद पडले आहे. तसेच महसूल सप्ताह सुरू असून शासनाचा महिला सबलीकरण योजनासुद्धा रेंगाळली आहे. (तालुका प्रतिनिधी)
इंटरनेटच्या रकमेसाठी तलाठ्यांचे काम बंद
By admin | Updated: August 5, 2016 00:28 IST