क्रौर्याची परिसीमा : चपराशीपुऱ्यातील घटना अमरावती : पैशांच्या हव्यासापोटी सासरच्या मंडळींनी क्रौर्याची परिसीमा गाठून सुनेला दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकले. ही घटना फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चपराशीपुऱ्यात २५ आॅगस्ट रोजी घडली. याबाबत पीडितेने शनिवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. दुरदाणा तबस्सूम रहिल अहमद (२५) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिच्यावर इर्विन रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरु आहेत. दुरदाणा ही यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत येथील रहिवासी आहे. तिचे लग्न ८ मे २०११ साली चपराशीपुऱ्यातील रहिवासी रहिल वल्द इल्याज याच्याशी झाले होते. तिला दोन अपत्ये आहेत. काही दिवस सुखाने संसार केल्यानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी दुरदाणाचा शारीरिक व मानसिक छळ करणे सुरु केले. माहेरवरून २५ हजार रुपये आणण्याचा तगादा तिच्यामागे लावण्यात आला. तिने नकार दिल्याने मारहाण सुरु झाली.दुरदाणाने बरेच दिवस हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, तिचा त्रास कमी झाला नाही. दुरदाणाने ही बाब माहेरच्यांना कळविली होती. त्यामुळे सन २०१३ मध्ये तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना २५ हजार रुपये सुध्दा दिले होते. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी कायमच होती. २५ आॅगस्ट २०१५ रोजी दुरदाणाचा पती रहिल वल्द इल्याज, नणंद सादीया नाद, नुसरतउल्ला खान, दुसरी नणंद सैयानाज व सासू हसिना बानो यांनी संगनमत करुन दुरदाणाला मारहाण केली आणि जबरदस्तीने दुसऱ्या माळ्यावर नेऊन तेथून खाली फेकून दिले. पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत दुरदाणाने ही माहिती दिली आहे. दुरदाणा ही दुसऱ्या माळ्यावरून थेट रस्त्यावर जाऊन पडल्याने तिचे दोन्ही दोन पाय व कंबरेची हाडे मोडली. सासरच्या मंडळीने तिला माहेरी नेऊन सोडून दिले होते. अतिदक्षता कक्षात उपचारअमरावती : प्रकृती बिघडल्याने तिला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे काही दिवस उपचार झाल्यावर पैशांअभावी सासरच्या मंडळींनी दुरदाणाला नेरपरसोपंत येथे तिच्या माहेरी नेऊन सोडले. याबाबत कोणालाही काहीही सांगितले तर इज्जाज नामक तीन वर्षीय मुलाला ठार मारू, अशी धमकीही देण्यात आली. सासरच्या मंडळींनी इज्जाजला सोबत नेले तर दीड वर्षीय दियानला दुरदाणाजवळच ठेवले. मुलाला ठार मारण्याच्या धमकीचा धस्का घेत दुरदाणाने आई-वडिलांना काही सांगितले नाही. मात्र, आई-वडिलांनी हिम्मत दिल्यावर दुरदाणाने सर्व हकिकत सांगितली. ११ सप्टेंबर रोजी आई-वडिल व भाऊ मोहम्मद आकिद यांनी दुरदाणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी रात्री दुरदाणाच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पालीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरूध्द तक्रार नोंदविण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ४९८ (अ), ३२५, ५०६, ३०७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
सुनेला दुसऱ्या माळ्यावरून फेकले
By admin | Updated: September 13, 2015 00:01 IST