अमरावती : वाड्या, वस्त्यांवर आणि शाळांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता म्हणून दरमहा ३०० रुपये पुरविण्यात येणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांकरिता ही रक्कम आता विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांची निवासानजीक शाळा नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतूक सुविधा किंवा वाहतूक खर्च उपलब्ध करण्याची तरतूद राष्ट्रीय शिक्षण हक्क कायद्यात करण्यात आली आहे. राज्यातील पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती राज्यस्तरावर नुकतीच संकलित करण्यात आली. या लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. वाहतूक खर्चापोटी केंद्र शासनाकडून त्यांना दरमहा ३०० रुपये अनुदान मिळते. राज्याच्या शिक्षण विभागाने या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय २७ जानेवारी रोजी घेतला होता. त्यानुसार समग्र शिक्षा योजनेंतर्गत ही रक्कम आता विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०२१ या दोन महिन्यांचा प्रतिविद्यार्थी सहाशे रुपये भत्ता दिला जाणार आहे. वाहतूक भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. विशेषत: आईच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल. या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांची शाळेत किमान ५० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे, अशा सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या आहेत.