अमरावती : जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सन २०२१-२२ शिक्षण विभागाकडून २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविले आहेत. याकरिता आता केवळ तीन दिवसांचाच अवधी शिल्लक असल्याने ५ सप्टेंबरपूर्वी प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १४ तालुक्यांमधून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यासंदर्भात २३ ऑगस्ट रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रस्ताव स्वीकारण्यासाठी २९ ऑगस्टची ‘डेडलाईन‘ शिक्षण विभागाने दिली आहे. या मुदतीत प्राप्त प्रस्तावाची छाननी करणे, पडताळणी करणे यासाठीही बराच अवधी लागणार आहे. यानंतर निवड समितीची बैठकीत आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र-अपात्र शिक्षक निवडले जातील. या प्रक्रियेनंतर अंतिम मान्यतेसाठी पात्र शिक्षकांची यादी विभागीय आयुक्ताकडे सादर केली. त्याच्या मंजुरीनंतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर होतील. नेहमीप्रमाणे ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी पुरस्कार होईल की नाही, याबाबत निर्णय होईल. एकंदरित या सर्व प्रक्रियेला बराच अवधी लागणार असल्याने यंदाही पुरस्कार वेळेवर वितरित होईल की नाही, याबाबत सांशकता आहे.