अमरावती : भूखंड खरेदीच्या व्यवहारात इसाराची रक्कम परत न देता मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने एका ऑटोचालकाने सोमवारी, १ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. या प्रकरणातील तीन आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
रूपेश संपतराव निंघोट (५२), सुभाष पुंडलिक दिघेकर (५२) व विजय गुलाबराव येरलेकर (५८) तिघेही रा. संबोधी कॉलनी, रहाटगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील चौथा आरोपी अनुप बारबुद्धे हा अद्याप फरार आहे. रहाटगाव येथील रहिवासी ऑटोचालक राजेश श्यामलाल कडू (५८) यांनी या चौघांसोबत भूखंड खरेदीचा व्यवहार केला होता. त्यासाठी इसार म्हणून राजेश कडू यांनी संबंधित चौघांना ५० हजार रुपये दिले होते. मात्र, खरेदी करण्यास टाळाटाळ होत असल्याने राजेश कडू यांनी संबंधितांना इसाराची ५० हजारांची रक्कम परत मागितली. यावेळी त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेचा राजेश कडू यांना जबर मानसिक धक्का बसला. सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील उद्यानामधून पत्नीला मोबाईलवर कॉल केला. संबंधित चौघांच्या त्रासामुळे आपण विष प्राशन करून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली. इसाराची रक्कम परत दिली नाही. शिवाय, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने आपण संबंधित चौघांमुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले. या प्रकरणी मृत राजेश कडू यांच्या पत्नीने रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज या प्रकरणातील आरोपी रूपेश निंघोट, सुभाष दिघेकर व विजय येरलेकर यांना अटक करण्यात आली. अनुप बारबुद्धे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.