आयुक्तांचा लक्षवेध : व्यापारी संकुलातील करारनाम्यातील गैरव्यवहार दडविण्याचा प्रयत्न ?प्रदीप भाकरे अमरावतीजवाहरगेटस्थित संकुलातील गाळ्यांच्या भाडेकरारामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा सारा दोष मृत व्यक्तीच्या माथी मारण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन कालावधीत कार्यरत असलेले संबंधित कर्मचारी आणि अन्य जण निर्दोष आहेत का? किंवा त्यांना निर्दोष ठरविण्याची धडपड तर केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा कोट्यवधींचा घोळ दडपविण्याचा प्रयत्न महापालिकेतील एका कंपुने चालविला आहे. बाजार परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी तत्कालीन आयुक्त आणि संबंधित विभागप्रमुखांना अंधारात ठेवत जवाहरगेट संकुलातील गाळ्यांचा भाडे करार केला होता. त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. प्रशासनाला बेदखल करत जयस्वाल यांनी स्वअधिकारात तो घोळ घातला होता. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात तो घोळ उघडकीस आला आणि हे प्रकरण थेट सिटी कोतवालीत दाखल झाले. भाडेकरारामध्ये तेथील दुकानदारांना अल्पभाड्यात आणि दीर्घ कालावधीसाठी गाळे देण्यात आले होते. हा प्रकार समोर येताच गुडेवार यांनी फौजदारी कारवाई करण्याची तयारी दाखविली. बरहुकूम तत्कालीन उपायुक्त चंदन पाटील यांनी शहर कोतवालीत तक्रार दाखल केली. ती तक्रार पोलीस आयुक्तांकडे देण्यात आली. गंगाप्रसाद जयस्वाल व अन्य ३२ जणांनी स्व अधिकारात फसवणूक करून भाडे करारामध्ये घोळ घातल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ती तक्रार होती. त्यानंतर शहर कोतवाली पोलिस स्टेशनकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागविण्यात आली. मात्र, बाजार व परवाना विभागाने जयस्वाल आणि इतरांसंदर्भातील कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही. त्यानंतर सप्टेंबर २०१६मध्ये शहर कोतवालीच्या ठाणेदारांनी पहिले स्मरणपत्र पाठवून महापालिकेला या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती मागविली. त्या स्मरणपत्राचे उत्तर म्हणून बाजार परवानाच्या अधीक्षकांनी १९ आॅक्टोबरला शहर कोतवालीला या प्रकरणाची माहिती पाठविली आहे. मात्र, या पत्रासोबत असलेल्या तीन पानी दस्ताऐवजामध्ये संपूर्ण दोष गंगाप्रसाद जयस्वाल या मृत कर्मचाऱ्याच्या माथी मारण्यात आला आहे. महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या एका वकीलाने जयस्वाल यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले असून, इतरांबाबत या पत्रात कुठलाही उल्लेख नाही. सोबतच जयस्वाल यांचा गुन्हा फसवणुकीत मोडणारा असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असा शेरा या पत्रातून देण्यात आला आहे. त्याचवेळी अन्य कर्मचाऱ्यांची या संपूर्ण गैरव्यवहारामध्ये काय भूमिका होती, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. गंगाप्रसाद जयस्वाल या मृत कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत तर काय हशील असेल, हे महापालिका जाणून आहे. मृत कर्मचाऱ्यावर कुठलेही गुन्हे दाखल केले तर कारवाई मात्र शून्य असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गाळ्यांच्या भाडेकरारामध्ये झालेल्या गैरव्यवहाराला जयस्वालच जबाबदार असल्याचे मत महापालिकेने मांडले आहे. एसीबी चौकशी का नाही? जयस्वाल यांनी केलेला घोटाळा एसीबीच्या अखत्यारीत येणारा आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार एसीबीमध्ये केली का, अशी विचारणा पोलिसांनी महापालिकेला केली आहे. याशिवाय या प्रकारात नेमकी कुणाची फसवणूक झाली, अशी विचारणा महापालिकेला करण्यात आली आहे.
‘त्या’ घोळातील मृतावर दोष; विद्यमान निर्दोष
By admin | Updated: October 25, 2016 00:05 IST