अमरावती : ठाण्यात येऊन आवाज चढविणे, आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा निर्माण करून ठाणेदारांशी लोंबाझोंबी करून ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह १० जणांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आणखी दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.
पोलीस ठाणे परिसरात आणण्यात आलेल्या वाहनात आरोपींनी पेट्रोलची बॉटल आणली होती. ती आणण्याचा उद्देश काय होता तसेच विनाक्रमांकाचे वाहन कुणाचे, याचा तपास तपास होण्याच्या उद्देशाने पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती गाडगेनगर ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला केली होती. ही मागणी न्यायालयाने मंजूर केली.
पोलीस सूत्रानुसार, अंबिका ललित अग्निहोत्री (२२, रा. विसावा कॉलनी, ह.मु. माताखिडकी), नेहा रोशन ढेंगे (३०, रा. मुक्ता सेंटर अपार्टमेंटनजीक, रहाटगाव), रूपाली बजरंग कोठार (३०, रा. कुंभारवाडा, महाजनपुरा), ललित रामसंजीवन अग्निहोत्री, भूषण गोविंदराव उईके, सौरभ धीरज निखाडे, सुमित हरिहरराव निखाडे, रोशन कृष्णराव घोरमाडे, राम मारोतराव तायडे, अभिजित अजय हिंगमिरे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३५३, १४३, १४७, १४८, १४९, १२० ब, १८६, १८८, १८९, २६९, २७०, २७१, सहकलम २, ३, ४ साथीचे रोग अधिनियम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सहकलम १२०, १७०, ११२, ११७, सहकलम ७ शासकीय गोपनियता अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला.
मुख्य आरोपी अंबिका ही गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीस ठाण्यात दोन चारचाकी वाहनांसह आली. सोबत व्हिडीओ कॅमेरा आणला. आरोपींनी ठाणेदार आसाराम चोरमले यांच्याशी हुज्जत घालून लोंबाझोंबी केली. ठाण्यात गोंधळ घालून घोषणाबाजी केली. तसेच ललित अग्निहोत्री याच्या मोबाईलने अंबिका हिने कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते फेसबूकवर पोस्ट केले. ठाणेदार चोरमले यांनी सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यासमोर आरोपीला ताब्यात घेत असताना, त्यांना मरणाच्या धमक्यासुद्धा दिल्या. तुमच्याविरुद्ध विधानसभेत लक्षवेधी लावतो, अशी धमकीसुद्धा दिली.