पाय घसरून पडलेल्या चोराचा मुद्देमाल विखुरला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:31+5:30

घरात शिरलेल्या चोराला पळून जाण्यास मार्गच नव्हता, अखेर दोन मजली इमारतीवरून बाजूच्या घरावरील पहिल्या माळ्यावर उडी घेऊन तो पळाला. मात्र, बॅडलक असे काही अंतरावरच पाय घसरून तो रस्त्यावर कोसळल्याने बेशुद्ध पडला. त्याने चोरलेले सोन्याचे दागिने व रोख रस्त्यावर विखुरले. शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता हा प्रकार देवरणकरनगरात वकील हरीश तापडीया यांच्या घरी घडला.

The thief's point of falling on the road was scattered | पाय घसरून पडलेल्या चोराचा मुद्देमाल विखुरला रस्त्यावर

पाय घसरून पडलेल्या चोराचा मुद्देमाल विखुरला रस्त्यावर

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । घरमालक दिसताच २० फुटांवरून घेतली उडी : देवरणकरनगरातील वकील हरीश तापडीया यांच्याकडे चोरीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चोरी करून पळण्याच्या बेतात असताना घरमालक दाखल झाले आणि चोराचीच पंढरी घाबरली. घरमालकाच्या आरडाओरडाने नागरिक एकत्रित आले. त्यांनी दोन बाजूने घेराव घालून चोराला पकडण्याचा बेत आखला. घरात शिरलेल्या चोराला पळून जाण्यास मार्गच नव्हता, अखेर दोन मजली इमारतीवरून बाजूच्या घरावरील पहिल्या माळ्यावर उडी घेऊन तो पळाला. मात्र, बॅडलक असे काही अंतरावरच पाय घसरून तो रस्त्यावर कोसळल्याने बेशुद्ध पडला. त्याने चोरलेले सोन्याचे दागिने व रोख रस्त्यावर विखुरले. शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता हा प्रकार देवरणकरनगरात वकील हरीश तापडीया यांच्या घरी घडला.
हरीश तापडीया यांचे आई-वडील जगन्नाथला गेले आहेत, पत्नी व मुले माहेरी गेले. शुक्रवारी तापडीया घरात एकटेच होते. रात्री ९ च्या सुमारास ते घराला कुलूप लावून क्राँती कॉलनीत मित्राकडे गेले. ४० मिनिटांनी ते घरी परतले असता, दार अर्धवट उघडे दिसले. आपण कुलूप लावले असताना दार उघडे कसे, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी दार लोटून घरात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आतून चोराने दार जोरात ढकलून बंद केले. तेव्हा हरीश यांनी चोर-चोर, असे ओरडून शेजाऱ्यांना हाक दिली. क्षणात नागरिक एकत्रित आले. चोर घरात शिरल्याची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. चोराला पकडण्यासाठी काही जण गॅलरीवर चढले. त्यावेळी चोर लोखंडी चॅनल गेटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांनी चोराला बाहेर ये, असेसुद्धा म्हटले. मात्र, त्याने पुन्हा दार बंद करून पळून जाण्यासाठी दुसरा मार्ग शोधला. नागरिक बाहेर असल्याचे पाहून चोराने थेट दुसºया माळ्यावरून शेजारच्या घरावर उडी घेतली. भिंतीवरून उडी घेऊन रस्त्यावर आला नि पाय घसरून खाली कोसळला. हा प्रकार हरीश यांना माहिती नव्हता. त्यावेळी चोर घरात असल्याचे ते समजत होते. मात्र, काही वेळातच त्यांच्या घरासमोरून जाणाºया रस्त्यावर पडलेल्या एका इसमाजवळ नागरिक गोळा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे चोराचा शोध घेणारे हरीश व शेजारी त्या इसमाजवळ पोहचले. त्याचे खिशातून सोन्याचे दागिने व रोख विखुरलेली असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपल्या घरी चोरी करणारा हाच चोर असल्याचे हरीश यांना खात्री पटली. दरम्यान राजापेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या चोराजवळील दागिने व रोख एका रुमालात बांधून ताब्यात घेतली. त्या चोराला सीआर व्हॅनमध्ये टाकून थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. चोराचा चेहरा पाहून तो रेकॉर्डवरील आरोपी शेख छोटु शेख दिलावर ऊर्फ ईल्ली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोराच्या पायाला, डोक्याला दुखापत
कुख्यात चोर शेख छोटू याला ईल्ली नावाने ओळखले जाते. चोरी करण्यासाठी तो अळीसारखा चढत असल्याचे पोलीस सांगत आहेत. शेख छोटूने शुक्रवारी शहरात घरफोडीसाठी हे निवडले होते. सायंकाळनंतर खोलापुरी गेट हद्दीत दोन, तर राजापेठ हद्दीत दोन घरफोड्या केल्याचे पोलीस सांगत आहेत. वकिल हरीश तापडीया यांच्याकडील चौथी घरफोडी त्याने केली आहे. दरम्यान हरीश तापडीया घरी पोहोचले आणि छोटू ऊर्फ ईल्लीने २० फुटांवरून उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पायाला व डोक्याला दुखापत झाली. शेजारच्या घरातील आवारात चोर ईल्लीचे रक्तसुध्दा सांडलेले आढळले.

राजापेठ पोलिसांनी केला पंचनामा
शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर शनिवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा मापारी, डीबीचे प्रमुख पोलीस हवालदार रंगराव जाधव, किशोर अंबुलकर, राजेश गुरुले, दिनेश भिसे, छोटेलाल यादव व अख्तर पठाण यांनी वकील हरीश तापडीया यांच्या घरी भेट दिली. चोर कसा शिरला, त्याने कोठून उडी घेतली, तो कसा पळाला, याची इत्थंभूत माहिती घेतली. पोलिसांनी त्यांच्या शेजारी राहणाºया जाजू यांच्या बंद घरातील आवारात प्रवेश करून चोरीच्या घटनेचा मागोवा घेतला. हरीश तापडीया यांच्या घरावर जाऊन चोराने उडी घेऊन कसे पलायन केले, ही बाब जाणून घेतली.

ईल्लीविरुद्ध राज्यभरात गुन्हे
शेख छोटू शेख दिलावर ऊर्फ ईल्लीविरुद्ध राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत. शेख छोटूविरुद्ध अमरावतीतील कोतवाली, राजापेठ, नागपुरी गेट, गाडगेनगर हद्दीतही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दीड वर्षांपूर्वी राजापेठ पोलिसांनी शेख छोटुला घरफोडीच्या गुन्ह्यात अटकही केली होती. त्याने राजापेठ हद्दीतील दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

Web Title: The thief's point of falling on the road was scattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.