स्थानिक आठवडी बाजार परिसरात अनेक वर्षांपासून सायकल दुरुस्तीचे दुकान चालविणाऱ्या ५५ वर्षीय पद्माकर मसेकर यांना अचानक दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले. मात्र, तरीही हतबल न होता त्यांनी दृढ विश्वासाने स्वत:चा व्यवसाय सुरूच ठेवला. डोळे गमावल्यानंतरही ते नेटाने सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करीत आहेत. गरीब परिस्थितीमुळे पद्माकर मसेकर यांना शिक्षण घेता आले नाही. संसाराची जबाबदारी कशी पेलावी?, हा प्रश्न होताच. शेवटी ३५ वर्षांपूर्वी पदमाकर यांनी नव्यावस्तीच्या आठवडी बाजार परिसरात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटले. सगळे काही सुरळीत सुरू असताना पदमाकर यांना पाच वर्षांपूर्वी एका आजाराने ग्रासले. त्यामुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यांना अंधत्व आले. तरीही त्यांनी अनेक वर्षांपासून सुरु असणारा व्यवसाय बंद न करता चिकाटीने तो सुरूच ठेवला. त्यांची दोन्ही मुले आता हाताशी आली आहेत. ती त्यांना त्यांच्या कामात हातभार लावतात. सायकल दुरुस्ती व्यवसायाच्या बळावरच त्यांनी एका मुलीचा विवाह देखिल उरकला. दृढ आत्मविश्वासाच्या बळावर त्यांचा हा आंधळा संघर्ष अतिशय डोळसपणे सुरू आहे. परिस्थितीशी अतिशय खंबीरपणे झगडणाऱ्या या व्यक्तिला अंधत्वाची खंत नाही. मात्र, शासनाने या संघर्षाची दखल घेऊन फुल ना फुलाची पाकळी मदत दिली तर बरे होईल, असे त्यांना वाटते.
अंधत्वातही ‘ते’ करतात सायकल दुरूस्ती
By admin | Updated: October 14, 2015 00:22 IST