अमरावती : खरीप २०१४ च्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस, जून महिन्यापासून दीड महिना पावसाची दडी व त्यानंतरही पावसात खंड यामुळे तुरीची पेरणी साधारणपणे २ महिने उशिरा झाली. परिणामी तुरीच्या पिकाला वाढीसाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. आता पीक फुलोऱ्यावर असताना पाऊस नाही, थंडी नाही, जमिनीत आर्द्रता नाही, यामुळे फुलोर गळायला सुरुवात झाली. मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील तूर पिवळी पडू लागले आहे. त्यावर आता ‘मर’ पिकाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. जिल्ह्यात आंतरपीक या अर्थाने तुरीचे पीक घेतले जाते. मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी यामध्ये आंतरपीक म्हणून तुरीला सर्वाधिक पसंती आहे. यंदा खरिपाचे सर्वसाधारण ७ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. पेरणी झालेले क्षेत्र ६ लाख ७९ हजार हेक्टर आहे. यावर्षी खरिपाची सरासरी ९५ टक्के हेक्टर पेरणी झाली. त्यामध्ये तूर ९८ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रात आहे. यंदा पेरणीपासून पाऊस कमी आल्यामुळे खरिपाची पेरणी आॅगस्ट अखेरपावेतो चालली. त्यामुळे तूर पिकाची पेरणी साधारणपणे दोन महिने उशिरा झाली. नंतरचा कालावधी पिकाच्या वाढीसाठी पोषक नव्हता. संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेता व्यतिरिक्त अन्य क्षेत्रात तुरीची पुरेशी सिंचनाची सोय असणाऱ्या शेताव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात तुरीची पुरेशी वाढ झाली नाही. आर्द्र्रता टिकवून ठेवणाऱ्या जमिनीव्यतिरिक्त मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील ओलावा व वातावरणात थंडी आवश्यक आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत पोषक वातावरणाअभावी तुरीचा फुलोर गळत आहे. तुरीवर सध्या ‘मर’ व ‘करप्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आधीच उशिरा पिकामुळे तुरीच्या उत्पादनात २५ टक्क््यांनी घट झालेली आहे. आता आर्द्रतेअभावी फुलोर गळत आहे. थंडीअभावी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने तुरीच्या उत्पादनात सरासरी ५० टक्क््यांनी घट येण्याची शक्यता आहे.
जमिनीत आर्द्रता नाही, तुरीवर संक्रांत
By admin | Updated: November 8, 2014 00:45 IST