यशोमतींचे सीपींना निवेदन : गोवंश वाहतुकीच्या संशयावरून झालेला हल्लालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कास्तकारांवर खोटे गुन्हे दाखल करणारे बजरंग दलाचे काही कार्यकर्ते जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत दंगल घडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्या कार्यकर्त्यांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना दिलेल्या निवेदनातून केली. रविवारी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी रेवसा फाट्यावर गोवंश वाहतुकीच्या संशयावरून विशेष समुदयातील नागरिकांशी झटापट केली होती. त्यावेळी बजरंग दलाच्या महेश मतेच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी चार जणांविरूद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविला. बजरंग दलाचे कार्यकर्ते कास्तकारांनाच वेठीस धरून गोवंश वाहतुकीचा आरोप करीत आहेत. ते गुंडगिरी करून कास्तकारांच्या जनावरांची वाहने अडवून, त्यांच्यावर हल्ला करून शेतकऱ्यांवरच गुन्हे नोंदवित असल्याचा आरोपही यशोमतींनी केला. याप्रकरणात जैनुल्ला खाँ, सलीम खान, वाहनचालक शेख राजीक व अजीज खाँ हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित काही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमक्ष शेख राजीक यांच्या कानशिलात लगावली होती. ही एका प्रकारे गुंडागुर्डी असून त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरूद्ध कायदेशिर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन मंगळवारी आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात विशेष समुदायातील काही नागरिक पोलीस आयुक्तांना भेटले. त्यांनी संजय शर्मा, नरसिंग बंग, मामा निर्मळ, महेश मते, कुलदीप निर्मळ, मंथन साबळे व शिवा निर्मळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांजवळ केली होती. पोलीस आयुक्तांनी कायदेशिर कारवाई करून संबंधित मुद्यावर बैठक बोलावून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचे आश्वासन यावेळी आ. यशोमतींना दिले.
..तर दंगल घडविण्यास "ते" कारणीभूत ठरतील
By admin | Updated: June 7, 2017 00:07 IST