दीडशे पोलिसांचा ताफा रस्त्यावर : गृहराज्यमंत्र्यांचे कडक निर्देश, अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळअमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी 'आॅल आऊट आॅपरेशन' मोहिमेत सोमवारी मध्यरात्री मद्यपींसह गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दीडशे पोलीस अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारीविषयक कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्याने मध्यरात्री शहरात फिरणाऱ्यांची दाणादाण उडाली होती. शहरातील गुन्हेगारीची स्थिती बघता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी 'आॅल आऊट आॅपरेशन' मोहीम राबवून पोलीस यंत्रणा कामाला लावली. त्यांनी स्वत: मध्यरात्रीदरम्यान शहरात गस्त घालून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाईचा बडगा उगारला होता. 'आॅल आऊट आॅपरेशन' मोहिमेदरम्यान त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, विवेक पानसरे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, मिलिंद पाटील व बळीराम डाखोरे यांच्यासह सर्व ठाण्यातील पोलीस निरीक्षक असा एकुण १३७ अधिकारी व कर्मचाऱ्याचा सहभाग होता. गेल्या तिन दिवसांपासून आयुक्तांनी या मोहिमेचे नेत्तृत्व करून मध्यरात्री शहरातील हालचालीचा आढावा घेऊन अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये सर्वाधिक प्रभावी कारवाई सोमवारी मध्यरात्रीची ठरली. पोलीस आयुक्त मंडलिक यांनी शहरातील विविध परिसरातील कानकोपऱ्यात जाऊन दंबग कारवाई केल्यामुळे मद्यपीसह गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले होते. पोलीस आयुक्तांनी स्व:ता मद्यपींच्या अड्ड्यावर धाडसत्र राबवून अनेक मद्यपीना ताब्यात घेतले. कान्याकोपऱ्यात लपून मद्यप्राशन करणाऱ्यांना बाहेर खेचून काढले. त्यांचे अड्डे उध्वस्त केले. अन्य पोलिसांच्या पथकाने विविध परिसरात नाकांबदी करून तब्बल ६५३ वाहनांची तपासणी केली, त्यामध्ये मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या १०७ वाहनचालकांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. तसेच या कारवाईदरम्यान पकड वॉरंटमधील दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांवर कारवाई केली आहे.केशव कॉलनीत पोलीस आयुक्तांचा 'राऊंड'शहरातील गुन्हेगारी व अवैध व्यावसायिकांसंबधी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त मंडलिकांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामध्ये केशव कॉलनीतील मद्यपी रस्त्यावरच दारू पिऊन धुमाकूळ घालतात. त्यांच्यावरही कारवाई करा, असे निर्देश पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास केशव कॉलनीत राऊंड मारला. त्यांनी तेथील स्थितीचा आढावा घेतला. प्रतिष्ठित नागरिकांचा परिसर म्हणून गणल्या जाणाऱ्या केशव कॉलनीतील एका मार्केटमध्ये दारूविक्रीचे प्रतिष्ठान आहे. त्या दुकानातून मद्यपी दारू विकत घेऊन सार्वजनिक रस्त्यावरच दारू पिण्यासाठी बसत होते. त्यामुळे त्या परिसरातील नागरिक मद्यपीच्या त्रासाला कंटाळले होते. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी धाडसत्र राबविले. दारू विक्रेत्याला पोलिसांनी तंबी दिली. तेव्हापासून या परिसरात दारूच्या धुमाकूळ थांबल्याचे आढळून आले आहे.बिअर शॉपी मालकावर कारवाईराजापेठचे पोलीस उपनिरीक्षक मंठाळे यांच्या पथक रुक्मिणी नगरात गस्त घालत होते. दरम्यान त्यांना करण बिअर शॉपी उघडी दिसली तसेच त्या शॉपीमध्येच काही जण दारू पिताना आढळून आले. मालकानेच ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी शॉपी मालकाविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम ८२ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. तसेच त्याच ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या एका इसमावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११० व ११७ प्रमाणे कारवाई केली. तडीपार अटकेतआॅल आऊट आॅपरेशन मोहिमेत पोलिसांची शहरात गस्त सुरु असताना तडीपार आरोपी विक्की ऊर्फ सलीम किशोरसिंग ठाकूर हा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १४२ प्रमाणे कारवाई करून त्याला अटक केली. दोन वाहनचालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची कारवाईशहरात मध्यरात्रीदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवून नागरिकांच्या जीवातास धोका निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ८ जणांवर कारवाईराजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या पथकाला गस्तीदरम्यान आठ जण सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आढळून आलेत. पोलिसांनी आठही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द कलम ११०, ११७ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. त्यातच गृहराज्यमंत्र्यी यांचेही आदेश होतेच. त्यानुसार शहरात आॅल आॅऊट आॅपरेशन चालवून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त
सीपींची दबंगगिरी, गुन्हेगारांची दाणादाण
By admin | Updated: October 26, 2016 00:22 IST