गजानन मोहोड अमरावतीशासनाद्वारे जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गहू व हरभरा या रबी पिकासाठी लागू करण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची असणारी ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छीक स्वरुपात आहे. हरभरा पिकासाठी या योजनेची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर व गहू पिकासाठी २२ नोव्हेंबर आहे. या कालावधीत जिल्ह्यात या पिकांची पेरणीच होत नसल्याने शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या बँका जगविण्यासाठीच केवळ पीक विमा योजना आहे काय? असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.अवेळी पाऊस, तापमान व आर्द्रता या हवामान घटकाच्या तीन धोक्यांपासून संरक्षण देणारी हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे. जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित महसूल मंडळस्तरावर क्षेत्र घटक धरून योजना राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. शासनाने विमा हप्त्यामध्ये दिलेल्या सवलतींचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, योजनेची अंतिम तारीख होईस्तोवर जिल्ह्यात गहू व हरबरा या पिकांची लागवड होत नसल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कृषी विमा कंपनी अंतर्गत ही योजना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व अधिसूचित पिकासाठी कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक करण्यात आली आहे.
पेरणीपूर्वीच संपणार पीक विम्याची मुदत
By admin | Updated: October 25, 2014 01:57 IST