अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावी उन्हाळी २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रानुसारच होणार आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.
दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या दरम्यान होतील. तर, बारावीच्या लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ यादरम्यान होणार आहे. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा ५ ते २१ एप्रिल यादरम्यान नियोजन करण्यात आली आहे. हल्ली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोरोना नियमावलींचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येतील, ही बाब शिक्षण मंडळाने स्पष्ट केली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत अथवा तारखांविषयी समाजमाध्यम, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या, मॅसेजद्धारे गैरसमज पसरविला जात आहे. परंतु, परीक्षांच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नाही. नियोजित वेळापत्रकानुसार निश्चित केंद्रावर परीक्षा होतील, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गाेसावी यांनी सांगितले. अमरावती विभागात दहावीचे १,६४,६३२ तर बारावीचे १,३७,५६९ परीक्षार्थी आहेत.
--------------------
ऑनलाईन शिक्षणावर भर
दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जवळ येत असताना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. शिक्षकांशी संवाद, अभ्यासादरम्यान येणाऱ्या अडचणीदेखील ऑनलाईन सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असून, कोरोना संसर्गाने यंदा शैक्षणिक सत्र धुळीस मिळविल्याची भावना विद्यार्थ्यांची आहे. वर्गात शिक्षण घेण्याची काही औरच पद्धत असते. ती ऑनलाईन शिक्षणात येऊ शकत नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
--------------------
अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चिंता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वर्ग शिकवणी बंद आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थांना अडचणींचे ठरणारे आहे.