दर्यापूरची घटना : दोन गटांत वाद, पोलीस ठाण्यावर शेकडोंचा जमावदर्यापूर : दुर्गादेवी विसर्जनादरम्यान मिरवणूक मार्गावर एका विशिष्ट समाजाकडुन मंडप टाकल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याने दोन्ही सामाजातील शेकडो नागरिक ठाण्यात जमले. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. ही घटना शनिवारी दुपारी जुन्या तहसीलजवळ घडली. येथील खोलापुरी गेट परिसरात जगदंबा दुर्गादेवीची मिरवणूक शुक्रवारी दुपारी ३ वाजता निघणार होती. परंतु परिसरात मिरवणुकीच्या मार्गावर मोहरमनिमित्त अल्पसंख्याक समाजाचा जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे मिरवणुकीला अडथळा आल्याने काहीनी मंडप काढण्याची मागणी केली. रस्त्यावर अनधिकृत मंडपदर्यापूर : मंडपाला काही युवकांनी विरोध केल्याने संतापलेल्या दुर्गादेवी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. याच मार्गावरून मिरवणूक निघेल. या भूमिकेमुळे दोन्ही गटांच्या युवकांमध्ये बाचाबाची झाली. या वादातून दोन्ही गटाचे साडेतिनशे नागरिक पोलीस ठाण्यात दुपारी १२.३० वाजतादरम्यान पोहोचले. यानंतर पोलीस व शांतता कमिटीच्या सदस्यांनी व राजकीय पुढाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. रस्त्यावर विनापरवानगी मंडप टाकणे गुन्हा आहे. नियोजित मार्गावरून मिरवणूक निघेल, असा निर्णय पोलिसांनी घेतला व मंडप काढण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी संबंधित समुदायाला दिले. यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांतता राखण्याची समज देण्यात आली. सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार यांनी ठाण्याला भेट दिली. (शहर प्रतिनिधी)दंगा नियंत्रण पथक शहरात दाखल१५० ते २०० नागरिकांचा जमाव दर्यापूर पोलीस ठाण्यात पोहोचल्यामुळे बंदोबस्तासाठी अमरावती येथील दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. दुपारी ३ वाजता शांततेत दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी खल्लार, येवदा पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, ठाणेदार नितीन गवारेसह पोलीस निरीक्षक प्रवीण तळी, पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे आदी अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा ताफा मिरवणूक बंदोबस्ताकरिता उपस्थित झाला होता.
दुर्गादेवी विसर्जनावरून तणाव
By admin | Updated: October 16, 2016 00:07 IST