निविदेचा प्रवास थांबणार : मार्चपासून मिनी स्टार बसेस रस्त्यावर धावणार अमरावती : महापालिका प्रशासनाद्वारे सुरु असलेल्या ‘आपली परिवहन’ शहर बसचा कंत्राट फेब्रुवारीमध्ये संपुष्टात येत आहे. त्याअनुषंगाने शहरवासीयांच्या सेवेत अत्याधुनिक बस मिळावी, याकरिता महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. नव्या वर्षात १ मार्चपासून मिनी स्टार बस शहरातील रस्त्यावर धावेल, अशी तयारी चालविली आहे.प्रशासनाने राज्य शासनाच्या संकेतस्थळावर स्टार बससंदर्भात निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली आहे. स्टार बस कंत्राटसाठी ई- निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. ७ डिसेंबरपासून सुरू झालेला ई- निविदेचा प्रवास ७ जानेवारी रोजी थांबणार आहे. बीबीओ तत्त्वावर ४० बसेस कंत्राटदाराला पुरवाव्या लागणार आहे. या स्टार बसेस शहराच्या गल्ली बोळातही ये- जा करतील, अशा सुविधा देण्याची सोय राहणार आहे. मिनी स्टार बस कंत्राटातून महापालिकेला केवळ रॉयल्टी अपेक्षित आहे. निविदा प्रक्रियेत अनेक बाबी स्पष्ट करताना महापालिकेने ‘बिल्ट आॅपरेटेट अॅन्ड ओन’ या तत्त्वावर बसेसची देखभाल, दुरुस्ती, कर्मचारी, वाहनतळ, कार्यशाळा आदी बाबी कंत्राटदारावरच सोपविल्या आहेत. ४० बसेस पुरविण्यासाठी १० कोटी रुपये अपेक्षित आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नियमानुसार बसेसची रॉयल्टी देण्याबाबत धोरण महापालिकेने आखले आहे. अटी, शर्थीच्या अधीन राहून महापालिका प्रशासन मिनी स्टार बसेसच्या निविदा प्रक्रिया जानेवारीत निश्चित करेल. नवीन मिनी स्टार बसेस शहरात येणाचा पहिला टप्पा गाठण्यात आला आहे.
नवीन शहर बसेससाठी निविदा प्रक्रिया
By admin | Updated: December 21, 2015 00:15 IST