फोटो पी २९ रोपे
परतवाडा : कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, त्या शेतकरी दाम्पत्याला दहा रोपे देणार आहे. मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून ही रोपे ग्रामपंचायतींमार्फत विनामूल्य दिली जाणार आहेत.
सामाजिक वनीकरण विभाग या अनुषंगाने ३१ मेपर्यंत माहिती घेऊन ३० जूनपर्यंत संबंधित ग्रामपंचायतींना ही रोपे उपलब्ध करून देणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे, त्या शेतकऱ्यांना १ जुलैला या रोपांचे वाटप केले जाणार आहे. वृक्ष लागवडीकरिता सामाजिक वनीकरण विभागाने ‘जोपासना हीच निसर्गाची उपासना’ आणि कन्या वनसमृद्धी या दोन योजना नव्याने आणल्या आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक य.ल.प्र. राव यांनी याची माहिती २७ मे रोजीच्या पत्राद्वारे विभागाच्या वनसंरक्षकांना दिली आहे.
दोन्ही योजना २०२१ च्या पावसाळ्यात निवडलेल्या गावांमध्ये संयुक्तरीत्या राबविल्या जाणार आहेत. याकरिता विभागीय वनअधिकारी व सहायक वनसंरक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान एका गावाची आणि वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी किमान दोन गावांची निवड करतील. निवडलेल्या गावांमध्ये वृक्षारोपणाची दक्षता अधिकारी व कर्मचाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. यात इको क्लब, स्वयंसेवी संस्था आणि अशासकीय संस्थाचा सहभाग घेतला जाणार आहे.