मोहन राऊत- धामणगाव रेल्वे : गत दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील दहा नगर परिषद व चार नगरपंचायतींची थकलेली मालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम तब्बल पाच कोटींच्या घरात आहे. वसुलीसाठी प्रशासनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे घर चालवायचे की कर भरायचा, असा प्रश्न थकबाकीदारांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी, शेंदूरजनाघाट, चांदूर बाजार, दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा या नगर परिषदा तसेच तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, धारणी या नगरपंचायतींमध्ये करवसुली दोन वर्षांच्या कोरोनाकाळात २० टक्क्यांच्या आत आहे. त्यासंबंधी अहवालच राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाला संबंधित नगर परिषद व नगरपंचायतींनी पाठविला आहे.
-------------
काय म्हणतात धामणगावातील थकबाकीदार?
कर भरावा इतके उत्पन्नच या दोन वर्षात झाले नसल्याचे थकबाकीदार सांगतात.आता कुठेतरी प्रवासी ये-जा करतात. उत्पन्न मर्यादित आहे. त्यामुळे घर टॅक्स भरणे सध्या शक्य नाही, अशा प्रतिक्रिया काही ऑटोरिक्षाचालकांनी दिल्या. नगर परिषदेचा टॅक्स नियमित भरतो. आता दोन वर्षापासून कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. टप्प्याटप्प्याने संबंधित कर भरण्यास आम्ही तयार आहोत, असे एका भाजीविक्रेत्याने सांगितले. दोन वर्षानंतर आता कुठे दुकान उघडले. त्याचे थकलेले भाडे भरावे की घरखर्च चालवावा, हा प्रमुख प्रश्न सलून संचालकांपुढे आहे. महिन्याला केवळ दीड हजार रुपये मिळतात. ते उत्पन्नदेखील कोरोनाकाळात नव्हते. काही घर मालकांनी काम करण्यासाठी परवानगी दिली. त्यात आधी कर कसा भरणार, असा प्रश्न घरकामगार महिलांनी केला आहे. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता कठीण झाले आहे. टॅक्स कसा भरायचा, असा सफाई कामगारांसह फेरीवाल्यांचा थेट सवाल आहे.
-------------
धामणगावात ५० लाखांची थकबाकी
धामणगाव नगर परिषदेच्या पाच हजार कुटुंब प्रमुखांकडे पन्नास लाखांच्या जवळपास थकबाकी आहे. मागील दोन वर्षांत नगर परिषदेने कोरोना काळामुळे मालमत्ता व पाणीपट्टी कर काही अंशी वसूल केला असला आता युद्धस्तरावर वसुली सुरू आहे. सध्या मोठ्या व्यवसायिकांकडे या वसुलीची मागणी होत आहे.
- प्रशांत उरकुडे, मुख्याधिकारी, नगर परिषद धामणगाव रेल्वे