अमरावती: जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला कोरोनाचे ग्रहण लागले असून, यंदा सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार जाहीर होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १४ तालुक्यातून ऑनलाइन प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले; मात्र हे प्रस्ताव ५ सप्टेबर पूर्वी स्वीकारले जातील. या पुरस्कारांसाठीच्या प्रस्ताव मागणी, त्याची छाननी करणे, पडताळणी करणे यासाठीही बराच अवधी लागणार आहे. यानंतर निवड समितीच्या बैठकीत आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र-अपात्र शिक्षक निवडले जातील. या प्रक्रियेनंतर अंतिम मान्यतेसाठी निवड पात्र शिक्षकांची यादी विभागीय आयुक्तांकडे सादर केली. त्याच्या मंजुरीनंतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर होतील. नेहमीप्रमाणे ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी पुरस्कार होईल की नाही, याबाबत निर्णय होईल. एकंदरी या सर्व प्रक्रियेला बराच अवधी लागणार असल्याने यंदाही पुरस्कार वेळेवर वितरित होतील की नाही, याबाबत साशंकता आहे.
दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत तर प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. या आदर्श शिक्षकांचा नंतर समारंभपूर्वक सन्मान केला जातो. आदर्श शिक्षकांना यापूर्वी वेतनवाढ दिली जात असे, अलीकडचे काही वर्षापासून ही वेतनवाढ देण्याची पद्धत बंद झाली असल्याने शिक्षकांची या पुरस्काराकडील ओढ संपली आहे. त्यामुळे दरवर्षी एकेका तालुक्यातून एखाद दुसरे प्रस्ताव येत असतात. कोरोना संकटामुळे मागील वर्षी प्रस्ताव दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाला कसरत करावी लागली होती. त्यानंतर पुरस्कार देण्यात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या पातळीवर निर्णय उशिरा घेतल्यात आला. याशिवाय विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली; मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे गतवर्षीची पुरस्कार निवड जाहीर झाल्यानंतर अद्यापही वितरित करण्यात आले नव्हते, यंदाही कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांकडून पुरस्कारासाठी फारशी उत्सुकता दाखवली जात नाही; मात्र दरवर्षीप्रमाणे उपक्रम म्हणून शिक्षण विभागाने यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव मागवले आहे; परंतु यासाठीची प्रक्रिया ही वेळेत पूर्ण होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
कोट
आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारीमार्फत ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यासाठी लिंक दिली जात आहे. याकरिता प्रस्ताव येताच यावर त्वरित कारवाई करून पुरस्कार वितरण करण्याचा प्रयन्न शिक्षण विभागाचा आहे.
एजाज खान
शिक्षणाधिकारी प्राथमिक.