अर्धे गाव तहानलेले : लोकप्रतिनिधींचा लक्षवेध
तळेगाव दशासर : गावात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. अर्ध्या गावाला जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असून, इतरांना खासगी बोअरचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या तळेगाव दशासर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१३ मध्ये २ कोटी रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. त्याकरिता महिमापूर येथे नव्याने विहीर तयार करण्यात आली. लोखंडे महाराज संस्थानजवळ नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली. पूर्ण गावात सिमेंट रोड फोडून पाईप लाईनचे जाळे टाकण्यात आले. मात्र, आजवर ही योजना पूर्णत्वास आली नाही. २०१३ साली तत्कालीन आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले होते व त्यानंतर कासवगतीने पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले. काम झाल्याने गावातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. घरापर्यंत पाणी पोहचेल असे वाटत होते. मात्र, त्यांचा हा आनंद काही दिवसांतच मावळला. गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. मात्र, काही काळानंतर समितीही थंड झाली. चौकशी अहवालही गुलदस्त्यातच आहे. एकूणच गावासाठी कोट्यवधी रुपयांची योजना राबवण्यात आली, मात्र अर्ध्या गावातील नागरिकांना अद्याप पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
-------------