अमरावती : कॅम्प स्थित गोल्डन कीड्स इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी इंद्रनील इंगोले याने पुणे येथे आयोजित संगीत स्पर्धेत आपले तडफदार तबलावादन सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली आणि पुरस्काराचा मानकरी ठरला. पुणे येथील अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य, नृत्य, संगीत समारोहाच्या भाव-राग-ताल स्पर्धेत अमरावतीच्या इंद्रनील इंगोले याने आपल्या स्वतंत्र तबला वादनाचा कार्यक्रम प्रस्तुत केला आणि उपस्थित संगीत रसिकांना तथा परिक्षकांना आपल्या गुणवत्तेची साथ पटवून दिली. परिणामस्वरुप इंद्रनीलला ‘चेअरमन अवार्ड’ प्राप्त होऊन तो बँकॉक येथे संपन्न होणाऱ्या पुढील स्पर्धेच्या निवडीकरिता पात्र ठरला.त्याला तबला वादनाचे धडे मिलिंद पंत यांचेकडून प्राप्त होत असून तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आजी-आजोबा, आप्तजन आणि गुरुजनांना देतो. इंद्रनील याच्या यशाबद्दल गोल्डन किड्स इंग्रजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे व शिक्षकवृंदांनी त्याचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)
तबलापटू इंद्रनील पुण्यात पुरस्कृत; बँकॉकच्या स्पर्धेसाठी निवड
By admin | Updated: August 12, 2015 00:16 IST