धारणी : धारणी व चिखलदरा तालुक्यांतील ९० पोलीस पाटलांची भर्तीसाठी ४ आॅक्टोबर रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालय नागपूर येथील जनहित याचिकेतील निकालामुळे ही भर्ती प्रक्रिया जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनानंतर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी स्थगित केली आहे. दोन्ही तालुक्यांतील ९० पोलीस पाटलांची जागा विविध कारणांनी रिक्त झाले होते. या रिक्त जागांची भर्ती प्रक्रिया एसडीओ कार्यालयात सुरू होती. ९० जागांसाठी आलेल्या अर्जांपैकी २२९ अर्ज पात्र ठरले होते. अशा पात्र उमेदवारांसाठी रविवार ४ आॅक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. या भर्तीसाठी मागविण्यात आलेल्या अर्जासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्रवर्गातील उमेदवारच अनेक गावांत नसताना भर्ती कशी होईल, त्यामुळे हे प्रश्न उपस्थित करून माजी आमदार पटल्या गुरुजी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूूर्ती प्रसन्ना वऱ्हाडे यांनी भर्ती प्रक्रियेसाठी काढण्यात आलेल्या पहिल्याच अटीला रद्द केले. त्यामुळे अटीप्रमाणे उमेदवारांकडे स्थावर संपत्तीबाबत तलाठ्याचा दाखला, उमेदवार गावाचा कायम रहिवासी असल्याचा दाखला असावा यालाच रद्द केल्याने इतरांचे अधिकार जोपासला जावा म्हणून ही भर्ती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे एसडीओ व्यंकट राठोड यांनी सांगितले. पोलीस पाटील पदभर्तीची परीक्षा होणार असल्याने काही उमेदवारांनी अभ्यासपूर्ण तयारी केली होती. मात्र त्यांची काहीशी निराशा झाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. (तालुका प्रतिनिधी)
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलीस पाटील भरती प्रक्रियेला स्थगिती
By admin | Updated: October 4, 2015 01:10 IST