साधारणपणे १९ ते १९.५ सेंटिमीटर आकाराच्या या कवड्या टिलवा पक्ष्याला त्याच्या सरळसोट चोचेमुळे मराठीत चंचल तुतवार' असे सुंदर पर्यायी नाव आहे.यालाच 'सँडरलिंग' असे इंग्रजी आणि 'कॅलीड्रीस अल्बा' असे शास्त्रीय नामभिधान आहे. हा पक्षी आपल्या विणेचा महत्त्वाचा काळ ईशान्य सायबेरिया तसेच अलास्का येथे घालवतो. हिवाळी स्थलांतरादरम्यान हा पक्षी इतर पक्ष्यांसोबत थव्याने भारतातील समुद्र किनाऱ्यावर येतो. पश्चिम किनारपट्टी आणि निकोबार भागात याचे आगमन कमी प्रमाणात होत असले तरी पूर्व किनाऱ्यावर बराच मोठा आढळ दिसून येतो .
पक्ष्याच्या पाठीचा आणि पंखाचा रंग फिकट राखाडी असतो. तो विणीच्या काळात लालसर करड्या रंगाचा दिसतो. पोटाचा रंग स्वच्छ पांढरा असून, चोच सरळसोट सडपातळ असते. पाय काळ्या रंगाचे असून, पायाच्या पंज्याला मागील बाजूस बोट नसते. इतर टिलवा पक्ष्यांच्या थव्यामध्ये याची ओळख पटवणे ही कठीण बाब असली तरी छोटा टिलवा या पक्ष्यापेक्षा मोठा आकार आणि खांद्याच्या पंखावरील भागात स्पष्ट काळसर धब्बा हा या पक्ष्याला ओळखण्याची खास खूण आहे. मोठ्या जलाशयाच्या काठावरील चिखलात, समुद्र किनारपट्टीवर भक्ष्य शोधण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या लाटांसोबत या पक्ष्याची मागे-पुढे होणारी लयबद्ध तुरुतुरु हालचाल खूप मनोहारी भासते.
‘ई-बर्ड’ या जागतिक दर्जाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नोंदींचा अभ्यास केल्यानंतर कवड्या टिलवा या पक्ष्याची ही विदर्भातील पहिलीच नोंद ठरली आहे.