समर्थकांत संभ्रम : नितीन गडकरींचा होकार; फडणविसांचा नकारगणेश वासनिक - अमरावतीमाजी मंत्री सुनील देशमुख यांच्या भाजप प्रवेशाबाबत अद्यापही मुहूर्त निघाला नाही. २१ जुलै रोजी ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार होते; मात्र काही अडचणींमुळे हा प्रवेश तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. हल्ली ते सर्मथकांच्या भेटी-गाठी घेत असून येत्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यावी याविषयी ते मते जाणून घेत आहेत. राजकीय परिस्थिती कशी राहील, यासंदर्भात भाजप प्रवेशबाबत त्यांची ‘वेट अॅन्ड वॉच’ ची भूमिका आहे.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक आणि राज्य मंत्रिमंडळात अर्थराज्य मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे सुनील देशमुख यांना सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अमरावती मतदारसंघाची उमेदवारी नाकारुन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांना दिली होती. या मतदारसंघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधीत्व करताना अचानक उमेदवारी नाकारल्याने सुनील देशमुखांच्या ही बाब तेव्हा चांगलीच जिव्हारी लागली. अखेर समर्थकांच्या आग्रहास्तव त्यांनी अमरावतीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. देशमुखांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत रावसाहेब शेखावत हे काँग्रेसचे आमदार म्हणून विधिमंडळात पोहचले. अमरावती मतदारसंघाचे मागील पाच वर्षांत बरेच राजकीय चित्र पालटले आहे. आ. रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात महापालिकेत काँग्रेसचे ३० सदस्य निवडून आलेत. महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून आ. शेखावत यांचे शहरात काँग्रेसवर साम्राज्य असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक नेकचंद पांडे हे येथे विधानसभा निवडणूक उमेदवारीच्या चाचपणीकरिता आले असता रावसाहेब शेखावत यांच्या व्यतिरिक्त एकाही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीबाबत पक्ष निरीक्षकांसोबत बातचित केली नाही. त्यामुळे अमरावती मतदारसंघात रावसाहेब शेखावत हे ‘वन मॅन शो’ असे चित्र आहे. मात्र पाच वर्षांपासून काँग्रेसमध्ये परतण्याची आस असलेल्या सुनील देशमुखांना काँग्रेसचे दरवाजे बंद झाल्याची राजकीय चित्र आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेल्या देशमुख यांनी नव्याने राजकारणाला प्रारंभ केला आहे. राज्यमंत्री असताना सर्वच राजकीय पक्षांशी सलगी असल्याचा लाभ कसा घेता येईल, याचे नियोजन देशमुखांनी आखल्याचे दिसून येते. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्यासोबत असलेल्या वैयक्तिक मैत्रीचा लाभ भाजप उमेदवारीच्या रुपाने घेण्याची त्यांची तयारी आहे. मात्र सुनील देशमुख यांच्याशी जुळलेला वर्ग हा धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा असल्याने हा वर्ग भाजपला मतदान करीत नाही, ही सर्वाधिक चिंता त्यांना भेडसावत आहे. त्यामुळे ‘कमळा’वर निवडणूक लढविली तर राजकीय परिस्थिती काय राहील? हा अभ्यास करण्यासाठी गल्लीबोळात जाऊन ते समर्थकांच्या भेटीगाठी घेत आहेत. परंतु देशमुख हे सन २०१४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून विधिमंडळात पोहचलेच पाहिजे, त्यांनी ठोस निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करावी, ही प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या समर्थकांमध्ये आजही संभ्रमावस्था कायम आहे. सुनील देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर पकडून असताना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाबाबत जोरदार विरोध चालविला आहे. गत आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार चाचपणीसाठी आलेल्या भाजप प्रदेश कोअर समितीपुढे त्यांच्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ही बाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी भाजप नेत्यांसमोर सुनील देशमुखांच्या उमेदवारीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे. देशमुख यांना अमरावतीची उमेदवारी द्यावी या बाजूने नितीन गडकरी असून जुन्याजाणत्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळावा, ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यामुळे देशमुखांच्या उमेदवारीवरुन नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद उफाळणार असल्याचे बोलले जाते.
सुनील देशमुखांचे ‘वेट अॅन्ड वॉच’
By admin | Updated: July 20, 2014 23:57 IST