अमरावती : विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. जिल्ह्यात चार जागांवर कमळ फुलले. त्यामुळे अमरावती मतदारसंघातून विजयी झालेले सुनील देशमुख व मोर्शीचे अनिल बोंडे यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.सुनील देशमुख आणि अनिल बोंडे हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. राजकारणात अनेक वर्षांपासून या दोघांचीही कारकिर्द सुरु आहे. मात्र यापूर्वी सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री, पालकमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. देशमुख हे नितीन गडकरी यांचे खासमखास असल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेलच, असे समर्थक ठामपणे बोलू लागले आहेत. मागील विधानसभेच्या कार्यकाळात काँग्रेसचे चार आमदार असताना एकाही आमदाराला मंत्री करता आले नव्हते. एवढेच नव्हे तर बाहेरील पालकमंत्र्यांनी अमरावतीचा कारभार हाकल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र ही परिस्थिती भाजपच्या काळात येणार नाही, याची दक्षता स्थानिक भाजपचे नेते घेत असल्याची माहिती आहे. जी चूक काँग्रेसने केली, ती भाजप करणार नाही. त्याकरिता संघाची चमू कामाला लागली आहे. काहीही झाले तरी अमरावतीत कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळालेच पाहिजे, त्याकरिता आतापासूनच नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधायला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागेल, अशी दाट शक्यता आहे. देशमुख, बोंडे यांची नावे मंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत.
सुनील देशमुख, अनिल बोंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी ?
By admin | Updated: October 19, 2014 23:14 IST