रस्त्यावर स्मशानशांतता : लिंबू, मटण, दारूसाठी शौकिनांची वणवण
परतवाडा : कोरोना रुग्णांसाठी ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या अचलपूर-परतवाडा शहरांत ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले. अशात रविवारी संचारबंदीत रस्त्यांवर स्मशानशांतता दिसून आली. मात्र, काही शौकीन लिंबू, मटण आणि दारूचा शोध घेताना दिसून आले. दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये भिकाऱ्यांचे काय होईल, ही सामाजिक जाण असलेल्या काहींनी त्यांच्यासाठी बिस्कीटचे वाटप केले.
अचलपूर परतवाडा जुळ्या शहरासह देवमाळी, कांडली शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्तांची संख्या आढळून आल्याने ठिकठिकाणी बॅरिकेड लावून हॉट स्पॉट ठिकाणांवर प्रवेशबंदी करण्यात आली. शनिवारी दुपारी ३ पासून लागलेली संचारबंदी सोमवारी पहाटे ७ वाजता उघडणार आहे. त्यामुळे रविवारी पूर्णत: संचारबंदी असल्याने स्मशानशांतता होती. परतवाडा शहरातून अमरावती ते बैतुल आंतरराज्य महामार्ग गेल्याने या मार्गावर जड वाहने काही प्रमाणात दिसून आली, तर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात स्मशानशांतता दिसून आली. परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा पोलिसांची पथके, महसूल व नगरपालिका कर्मचारी दंडात्मक कारवाई करताना व नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला देताना दिसून आले.
------