मोर्शी (अमरावती) : नजीकच्या श्रीक्षेत्र पाळा येथील एका उच्चशिक्षित युवा शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेतात संत्र्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान उघडकीस आली. सुमित केशवराव राऊत (३१, पाळा) असे मृताचे नाव आहे.
सुमित राऊत यांची पाळा शिवारात शेती आहे. शेताच्या पेरणीसाठी सुमितने बँकेचे कर्ज घेतले होते. सोयाबीन, उडीद, मूग, कपाशीची पेरणी केली होती. पीक वाढण्यासाठी त्याने महागड्या खत, कीटकनाशक वापरले. मजुरीवर अवाढव्य खर्च केला. मात्र, अतिवृष्टी व खोडकिडीमुळे सोयाबीन पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. कपाशी बोंडअद्ने गारद झाली. सर्व पिके नष्ट झाल्याने कर्ज कसे फेडायचे तसेच उच्चशिक्षित असताना नोकरीसुद्धा मिळत नाही. या विवंचनेत सुमित नेहमी राहत होता. वडील नसल्याने कुटुंबाचा तोच आधार होता. त्यातच त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असे नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी सुमितचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आणला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन केले. २० मार्च रोजी सुमितवर अंत्यसंस्कार होतील.