जितेंद्र दखणे - अमरावतीजिल्ह्यातील मेळघाट हा कुपोषणामुळे सर्वत्र ओळखला जातो. मात्र, याच आदिवासीबहुल भागातील शेतीही लाखमोलाची आहे. धारणी तालुक्यात ऊस उत्पादकांची संख्या अधिक आहे. मात्र येथे ऊसावर प्रक्रिया करणारा प्रकल्प या तालुक्यात नसल्यामुळे या शेती पिकाला बळ देण्यासाठी साखर कारखानदारीला उभारी देणे आता काळाची गरज झाली आहे.जिल्ह्यातील ऊस उत्पादनाचा मागील १५ ते २० वर्षांतील टक्का घटला असला तरी मेळघाटातील धारणी या तालुक्यातील ऊस उत्पादनात सध्याही जिल्ह्यात आघाडीवर आहेत. धारणी तालुक्यात सुमारे ४७ हजार २१४ हेक्टर क्षेत्र पीक लागवडीखाली आहे. यापैकी सुमारे २३० हेक्टरवर ऊसाचे उत्पादन येथील शेतकरी घेत आहेत. मात्र येथे साखर कारखाना नसल्याने धारणी तालुक्यातील ऊस उत्पादकांना मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर, हरदा, फाजलपूर येथील खासगी साखर कारखान्यात न्यावा लागतो. येथील जवळपास ५० हजार मेट्रिक टन ऊस धारणी व चिखलदरा तालुक्यात उत्पादित होत असल्याची माहिती. यासाठी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस कापणी, ट्रॉन्सपोर्टचा येणारा खर्चही स्वत:च्या खिशातून द्यावा लागतो. ऊस आहे पण कारखाना नसल्यामुळे येथील आदिवासी ऊस उत्पादकांना ऊसाची शेती करण्यास प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे ऊसाला पोषक शेती असतानाही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना इतर पिकांचा मार्ग निवडावा लागत आहे. या भागात साखर कारखाना उभारण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीकडे राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ऊस आहे, सहकारी साखर कारखाना नाही
By admin | Updated: November 4, 2014 22:33 IST