दोन अटकेत : २८९ मेंढ्या, ११३ बकऱ्या, १२ वासरे वनविभागाच्या ताब्यात, पशुपालकांचे दणाणले धाबे पोहरा बंदी/अमरावती : अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी शनिवारी १० कि.मी.च्या जंगलात पायी फिरून 'सर्जिकल स्ट्राईक' केले. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली. २८९ मेंढ्या, ११३ बकऱ्या व १२ वासरे ताब्यात घेण्यात आलेत. वनविभागाच्या या कारवाईमुळे पशुपालकांचे धाबे दणाणले आहे. पावसाळ्यात जंगलातील हिरव्यागार वातावरणात अवैध चराईला उधाण येते. सर्व गवत असल्याने जंगलाशेजारी असलेल्या गावांतील मेंढपाळ जनावरे अवैध चराई करण्यासाठी सोडून देतात. दररोज जंगल चराई होत असल्यामुळे नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान होते. वर्षभरात अवैध चराईसंदर्भात अनेकदा किरकोळ कारवाई केली जाते. मात्र, शनिवारी वनविभागाने जंगलात सर्जिकल स्ट्राईक अभियान राबवून वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईची सर्व सूत्रे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी स्वत: सांभाळली. सहायक उपवनसरंक्षक राजेंद्र बोंडे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर, चांदुररेल्वे वनपरिक्षेत्राचे अनंत गांवडे, परतवाडा रेंजचे बारखडे, घागरे, वनपाल विनोद कोहळे, घागरे, वनरक्षक देशमुख, ठाकूर, नैतनवार, महाजन, खडसे, शेंडे, वनमजूर किशोर धोटे, बाबाराव पळसकर, दीपक नेवारे, वानखडे यांच्यासह धाडसी धाडसत्र राबविले. पोहरा जंगलात पायी फिरून चराई करणाऱ्या जनावरांची पाहणी केली. त्यामध्ये कारला बिटमधील पाथरगाव शेजारच्या जंगलातून २८९ मेंढ्या व ४० बकऱ्या ताब्यात घेण्यात आल्या. पशुपालक निंबाजी बिचुकले याला अटक केली. त्याचप्रमाणे वनविभागाच्या अन्य पथकाने भानखेडा जंगलातील ६४ बकऱ्या ताब्यात घेतल्या. येथून गोपाल रामजी चव्हाण याला अटक केली, तर दक्षिण चिरोडीच्या अंबा बिटमधून ९ बकऱ्या व १२ वासरे ताब्यात घेण्यात आल्यात. अज्ञात पशुपालकांचा वनविभागाने शोध चालविला आहे. वनविभागाने आरोपींविरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २६, १ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या जनावरांना कारला येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर जनावरांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. मीना यांच्या धाडसी कारवाईमुळे पशुपालकांसह त्यांच्या अधिनस्थांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)१५ एकरांचे जंगल नष्टवडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील पोहरा, कारला व चिरोडी जंगलात वनविभागाने सर्जिकल स्ट्राईक राबवून तब्बल ४१४ जनावरांना ताब्यात घेतले. ही जनावरे दररोज चराई करीत असल्याचे निदर्शनास आले असून या जनावरांनी तब्बल १५ एकरांचे जंगल चराई करून नष्ट केले आहे. या चराईमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चराईमुळे जंगलातील ग्रेझिंनचे नुकसान होत आहे. नवीन झाडांची वाढ होत नसून ती नष्ट होत आहे. अवैध चराई ही मोठी समस्या असल्याने ही धडक कारवाई करण्यात आली. पुढील काळासाठी नैसर्गिक संपत्ती टिकविणे अत्यावश्यक आहे, तेव्हाच मानवाला शुध्द हवा व पाणी मिळू शकेल. - हेमंतकुमार मीना, उपवनसरंक्षक, वनविभाग, अमरावती
मिनांचा पोहरा-चिरोडी जंगलात ‘सर्जिकल स्ट्राईक’
By admin | Updated: October 16, 2016 00:06 IST