प्राथमिक शिक्षक समितीचा पुढाकार; विद्यार्थ्यांनी पाठविली पत्रे
अमरावती : शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यभरातील एक लाखावर विद्यार्थी व शिक्षक मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे घालणार आहे.राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. शाळा सुरू करावी अशी विनंती करणारे पत्र पाठविले जाणार आहेत. शाळा अविलंब सुरू करण्यासाठी शिक्षक समितीनेच सर्वप्रथम १६ जूनला मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे. चालू सत्रात आठव्या वर्गापासून शाळा सुरू झाल्या. मात्र अद्याप इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग बंदच आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकच नव्हे तर शाळा इमारतीलाही विद्यार्थ्यांनी पाहिलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य काळोखात ढकलल्या जाण्याची दाट संभावना आहे. शिक्षकाची संघटना म्हणून शाळा सुरू करण्याच्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पत्राद्वारे विनंती करण्याचा उपक्रम सुरू करत असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी स्पष्ट केले, असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले. शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षक स्वहस्ताक्षरात पोस्टकार्डद्वारे करणार आहे. प्रत्येकी पन्नास पैशाचे पोस्टकार्ड शिक्षक समितीचे पदाधिकारी उपलब्ध करून देतील. हा मजकूर शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मकच असेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा किंवा अन्य मान्यवरांचा उपमर्द होईल, असा मजकूर नसावा. पत्र लिहिताना मर्यादाभंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन संघटनेने पदाधिकाऱ्यांना केले केले आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना माहिती देऊन पत्र पाठवण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे. बाजारपेठ, सभागृहे व अन्य स्वरूपातील गर्दीची ठिकाणे सुरू झाली असताना शाळा बंद असणे अनाकलनीय आहे. बालकांच्या मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्यासाठी शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे पटवून दिले जाणार आहे. विद्यार्थी आपल्या पत्रातून शाळा बंद असल्याचे निदर्शनास आणतील. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा माझ्याकडे नसल्याने माझे शिक्षण थांबले आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा लवकर सुरू कराव्यात, अशी विनंती विद्यार्थी पत्रातून करणार आहेत.