मोर्शी : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्यावतीने शालेय व क्रीडा संघटनांद्वारे आयोजित ज्युनिअर व सब-ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दरवर्षी सवलतीचे गुण देण्यात येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने दहावी व बारावीत असताना स्पर्धेत किमान सहभागाची अट शिथिल करून गतवर्षीपर्यंत खेळलेल्या विद्यार्थी खेळाडूंना विनाअट यावर्षी ग्रेसगुण देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर, शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
कोविडमुळे या सत्रात क्रीडा स्पर्धा न झाल्याने राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीवर पाणी फेरले गेले. त्यातच सहभागाची अट शिथिल न झाल्यास ग्रेसगुणांपासून खेळाडू वंचित राहतील व विद्यार्थ्यांत नैराश्य येऊन ऐन परीक्षा कालावधीत मानसिकता ढळून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने विनाअट ग्रेसगुण द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महामंडळ अमरावतीचे अध्यक्ष अरुण खोडस्कर, सचिव पुरुषोत्तम उपर्वट, सहसचिव शिवदत्त ढवळे, राजेंद्र कोतकर, समन्वय समितीचे सचिव ज्ञानेश काळे, प्रदीप खडके,नितीन चवाळे, श्रीकांत देशमुख, अजय आळशी, संदेश गिरी, विजय मानकर, महेश अलोने, संदीप इंगोले, ललित ढोके, अविनाश साळकर यांनी केली आहे.