अमृता फडणवीस यांचे आश्वासन : कलोती कुटुंबाला भेटअमरावती : देवेन्द्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांच्या सहचारिणी अमृता फडणवीस मंगळवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील योगासन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आल्या. तेथून त्यांनी बालाजी प्लॉट येथील रहिवासी देवेंद्र फडणवीस यांचे मामा चंद्रकांत कलोती यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी कलोती यांनी अमरावती जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. त्यावर त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचे आश्वासन दिले.मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात बृहन महाराष्ट्र योग संमेलन व राज्यस्तरीय योगासन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अमृता फडणवीस आल्या होत्या. कार्यक्रम आटोपताच त्यांनी बालाजी प्लॉट येथील रहिवासी चंद्रकांत कलोती व त्यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. नागपूर येथून येण्यापूर्वीच अमृता फडणवीस यांची अमरावतीत येण्यासंबंधी मामा कलोती यांना अवगत केले होते. त्यामुळे अमृताच्या स्वागतासाठी सर्व कलोती कुटुंबीय आतूर होते. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अमृता फडणवीस या कलोती यांच्या घरी येताच त्यांचे सर्वांनी स्वागत करीत आनंद व्यक्त केला. अमृता यांनी कलोती कुटुंबीयांसोबत तब्बल दोन तास गप्पा मारल्या. यादरम्यान कलोती कुटुंबासोबत त्यांनी घरीच जेवण घेतले. सर्र्वांसोबत कौटुंबिक चर्चा करीत सर्व कुटुंबीयांची आस्थेने विचारणा केली. यावेळी चंद्रकांत कलोती यांनी जिल्ह्यातील समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था, बेरोजगारी, विमानतळ, उद्योग, पाणी प्रश्न अश्या अनेक मुद्द्यांवर ही चर्चा झाली. अमृता फडणवीस यांनीही अमरावतीच्या विकासात सहकार्य करण्याची भूमिका कलोती यांच्यासमोर विशद केली. दुपारी ३.३० वाजता त्या येथून नागपूरकडे रवाना झाल्यात. यापूर्वीही अमृता फडणवीस यांंनी अनेकदा पती देवेंद्र यांच्यासोबत मामांच्या घरी भेट दिली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट असल्याने कुटुंबीयांमध्ये हर्षोल्लास दिसून येत होता. यावेळी कलोती कुटुंबीयांतील मामा चंद्रकांत कलोती यांच्या पत्नी मोहिनी, सुरुची कलोती, रोहिणी कलोती, सरवेश दाणी, स्वरा दाणी व अन्य कुटुंबीयांची उपस्थिती होती.
अंबानगरीच्या विकासासाठी प्रयत्नरत
By admin | Updated: November 4, 2014 22:31 IST