अमरावती : सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. शहरातही ठिकठिकाणी उमेदवारांनी प्रचार कार्यालय उभारले आहेत. शुक्रवारी समान्यांसह उमेदवारदेखील ‘विजयादशमी’ साजरी करीत असताना व शनिवारी झालेल्या धुंवाधार पावसाने अनेक उमेदवारांचे बुथ अक्षरश: भुईसपाट केले. विजया दशमीनिमित्त जनसंपर्क वाढविण्याऐवजी आवरा-सावर करण्यासाठी कार्यकर्त्यांची पळापळ झाली. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रंचड वादळासह पावसाने हजेरी लावली. या धुंवाधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत झाडे कोसळली. कित्येक वस्त्यांमध्ये घरांवरील छप्परदेखील उडून गेले. पावसाच्या या तावडीतून राजकीय पक्षाचे उमेदवारही सुटू शकले नाहीत. राजापेठ चौकातील राष्ट्रवादी काँंग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे बुथ वादळाने खाली पडल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. महत्प्रयासाने उमेदवारांनी कोसळलेले बुथ पुन्हा कसेबसे उभे केले.मात्र शनिवारी दुपारी १ वाजताच्यादरम्यान पुन्हा अचानक दमदार पावसाने हजेरी लावल्याने काही उमेदवारांच्या बुथची पुन्हा हानी झाली.
वादळी पावसाचा प्रचार कार्यालयांना तडाखा
By admin | Updated: October 4, 2014 23:18 IST